धक्कादायक! अंत्यसंस्कार केले अन् नंतर समजलं, तो कोरोनाबाधित होता!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:17 AM2020-04-23T10:17:51+5:302020-04-23T10:18:32+5:30
कडेगाव तालुक्यातील प्रकार, २८जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल
कडेगाव (जि. सांगली) : कडेगाव तालुक्यातील खेराडे- वांगीमध्ये शनिवारी (दि.१८) एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि बुधवारी (दि. २२) समजले की, ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह होती! आता खेराडे-वांगी गावातील २८ जणांना कडेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कडेगावच्या तहसीलदार शैलजा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे यांनी दिली.
खेराडे-वांगी गावातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या ३५ वर्षे वयाच्या एका व्यक्तीस मुंबई येथे एका रुग्णालयात शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवार, १८ एप्रिलला पहाटे त्याचे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह खेराडे- वांगीत आणला. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु बुधवारी दुपारी या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे संबधित हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यानंतर तात्काळ आरोग्य विभाग तसेच प्रांताधिकारी गणेश मरकड, कडेगाव तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी गावास भेट देऊन कोरोना पॉझटिव्ह व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या २८ व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.