Sangli Crime: पलूसमधील वृद्धाच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पाच लाखाची सुपारी अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 03:37 PM2023-02-11T15:37:08+5:302023-02-11T15:37:39+5:30
पोलिसांनी पाचजणांना केली अटक
पलूस : बांबवडे (ता. पलूस) येथील अपघातात ठार झालेले विजय नाना कांबळे (वय ६२) यांचा अपघात नसून जमिनीच्या वादातून धडक देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पलूस येथील सुनील केशवराव घोरपडे (वय ५२) व अभयसिंह मोहनराव पाटील (४०) यांनी कांबळे यांना मारण्यासाठी तिघांना पाच लाखांची सुपारी दिल्याचे समाेर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. शुक्रवार (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली हाेती.
मृत विजय कांबळे हे पलूस न्यायालयातील काम आटाेपून तहसील कार्यालय ते पोलिस ठाणे रस्त्यावरून निघाले हाेते. या दरम्यान एका अज्ञात माेटारीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हाेता. अपघाताचे प्रत्यक्षदर्शी जितेश सुरेश बनसोडे (रा. नागराळे) यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली होती.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास करताना नंबरप्लेट नसलेली एक आलिशान माेटार कुंडलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याची माहिती समाेर आली. सीसीटीव्ही फुटेजची मदत व तांत्रिक तपासात भरधाव वेगाने जाणारी माेटार (एमएच ०९ डीएम ४०४१) कोल्हापूर येथील एका व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाले.
त्या व्यक्तीची चाैकशी केली असता २०२१ मध्ये ही माेटार भवानीनगर (ता. वाळवा) येथील संग्राम राजेंद्र पाटील (वय २२) याला दोन लाखास गहाण दिल्याचे समाेर आले. संग्राम पाटील याला ताब्यात घेऊन कसून तपास केला असता त्याने कांबळे यांना धडक दिल्याची कबुली दिली. दरम्यान, पलूस येथील सुनील घोरपडे व अभयसिंह पाटील यांच्याशी संपर्काचे तांत्रिक पुरावे मोबाइल संपर्कावरून स्पष्ट झाले.
तपासात कांबळे यांचा अपघात नसून सुपारी देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. विजय कांबळे याचा अभयसिंह पाटील व सुनील घोरपडे यांच्याशी कूळकायद्यातील बारा एकर जमिनीचा वाद हाेता. कांबळे वारंवार त्यांना पाेलिसांत खोटे गुन्हे दाखल करतो म्हणून धमकावत हाेते. यामुळे कांबळे यांना उचलून नेऊन किंवा धडक देऊन ठार मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी सुनील घोरपडे व अभयसिंह पाटील यांनी संग्राम पाटील याला दिली.
यानंंतर संग्रामने आपले मित्र रुतीक भोपाल पाटील (वय २२) व रोहन रमेश पाटील वय २४, दोघेही रा. घोगाव) यांना घेऊन विजय कांबळे याच्यावर पाळत ठेवली. २० जानेवारी राेजी कांबळे तहसील कार्यालय ते पाेलिस ठाणे रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना माेटारीची धडक दिली.
तांत्रिक व परिस्थितिजन्य पुरावे तपासून पाचही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दि. १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे, उपनिरीक्षक सुरेंद्र धुमाळे, राजेश्री दुधाळे, हवालदार प्रवीण पाटील, दिलीप गोरे, राकेश भोपळे, गणी पठाण, संजय गलुगडे, प्रमोद साखरपे, प्रवीण मलमे, अमोल कदम यांनी केला.