धक्कादायक! सांगलीत भटक्या कुत्र्यांच्या तोंडात होते दोन महिन्यांचे मुल, कुत्र्यांनी तोडले शरीराचे लचके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 03:16 PM2017-10-22T15:16:39+5:302017-10-22T15:23:23+5:30
कर्नाळ रस्त्यावर कमरेखालचा भाग नसलेले अर्भक शनिवारी सकाळी सापडले. मोकाट कुत्रे या अर्भकास तोंडात घेऊन जाताना काहींनी लोकांनी पाहिले.
सांगली - येथील कर्नाळ रस्त्यावर कमरेखालचा भाग नसलेले अर्भक शनिवारी सकाळी सापडले. मोकाट कुत्रे या अर्भकास तोंडात घेऊन जाताना काहींनी लोकांनी पाहिले. नागरिकांनी या कुत्र्याचा पाठलाग केल्यानंतर त्याने अर्भक टाकून पलायन केले.
कर्नाळ रस्त्यावर विष्णुअण्णानगर येथे दामाजी करांडे यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये अर्भक सापडले. शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अर्भकाच्या मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली. साधारणपणे दोन महिन्यापूर्वी या अर्भकाचा जन्म झाला असावा. मोकाट कुत्रे हे अर्भक तोंडात घेऊन शिवशंभो चौकातून पुढे जाताना काही लोकांनी पाहिले. लोकांनी या कुत्र्याचा पाठलाग केला. त्यामुळे भीतीने कुत्र्याने तोंडातील अर्भक करांडे यांच्या प्लॉटमध्ये टाकून पलायन केले.
अर्भकाच्या कमरेखालील भाग नसल्याने ते पुरुष का स्त्री जातीचे आहे, हे समजू शकले नाही. बायपास रस्ता परिसरात रात्रीच्यावेळी कोणीतरी या अर्भकास फेकून दिल्याचा संशय आहे. मोकाट कुत्र्यांनीच अर्भकाच्या खालीला भागाचे लचके तोडले असण्याची शक्यता आहे. शहर पोलिसांनी परिसरात चौकशी सुरु ठेवली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर कुठे आहते का, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.