धक्कादायक! दिव्यांग विद्यार्थ्यावर राखणदाराकडून अनैसर्गिक अत्याचार; तासगाव तालुक्यातील प्रकार
By श्रीनिवास नागे | Published: February 8, 2023 02:41 PM2023-02-08T14:41:46+5:302023-02-08T14:42:20+5:30
तासगाव तालुक्यातील एका गावातील निवासी शाळेत राखणदार म्हणून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने दिव्यांग विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली.
तासगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्यातील एका गावातील निवासी शाळेत राखणदार म्हणून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने दिव्यांग विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी कंत्राटी राखणदार संदीप दत्तात्रय भोकरे (रा. तासगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
रविवार, दि. ५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास निवासी शाळेतील सर्व विद्यार्थी झोपले होते. त्याठिकाणी राखणदार असलेल्या संदीप भोकरेने सहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन दिव्यांग मुलाला पाठीमागून मिठी मारली व त्याचे तोंड दाबून अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन दिव्यांग मुलगा जोरजोरात ओरडू लागला. तेव्हा त्याच्या आवाजाने दोन विद्यार्थी उठले. त्यावेळी भोकरे पीडित व त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मुलांना मारहाण करून ’कोणास सांगितले तर आणखी मारेन’, अशी धमकी देऊन गप्प बदवले.
मात्र पीडित मुलाने सोमवार, दि. ६ रोजी ही घटना शिक्षकांना सांगितली. यानंतर शिक्षकांनी संबंधित मुलांच्या पालकांशी संपर्क साधून माहिती दिली. मंगळवारी पीडित मुलाच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली.
संदीप भोकरेवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम आणि अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमप्रमाणे तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. तासगाव न्यायालयात त्यास हजर केले असता त्याला न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक संदीप गुरव अधिक तपास करत आहेत.
दोषींवर कठोर कारवाई करा
दिव्यांग विद्यार्थ्याबाबत कर्मचाऱ्याने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. याप्रकरणी दोषीवर व संस्थेवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुमठेचे माजी सरपंच महेश पाटील यांनी केली आहे.