शूऽऽऽ शोध सुरू आहे... संजयकाकांच्या पर्यायाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:55+5:302021-01-08T05:25:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांशी उभा दावा, जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांशी टोकाचे मतभेद, पक्षापेक्षा स्वत:च्या गटाच्या मजबुतीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांशी उभा दावा, जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांशी टोकाचे मतभेद, पक्षापेक्षा स्वत:च्या गटाच्या मजबुतीवर भर, बेभरवशाचे राजकारण आणि विरोधकांशी अतिसलगी यामुळे खासदार संजयकाका पाटील यांना पर्याय देण्याच्या विचारात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षातील अस्वस्थतेमुळे लोकसभेसाठी नवा चेहरा देण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत.
लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीआधी संजयकाका पाटील यांनी वाऱ्याची दिशा ओळखून हातातील ‘घड्याळ’ काढले. भाजपचे कमळ जवळ केले. मोदी लाट आणि काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे ते खासदार झाले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना वरदहस्त मिळाला. मात्र माजी मंत्री तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे कधीच जमले नाही. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील ‘लॉबिंग’ची स्पर्धाही त्याला कारणीभूत आहे. त्यातच वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या वादातून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशीही काकांचे वाजले. ‘वालचंद’मध्ये देशमुखांनी बसवलेल्या संचालकांना काकांनी पळवून लावले! तेव्हापासून दोघे एकमेकांना पाण्यात पाहतात. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे काकांवर तोफ डागली. जिल्ह्यातील आमदारांच्या मंत्रिपदामध्ये काका अडसर ठरत असून, इतर नेत्यांना दाबण्याचे राजकारण ते करत असल्याची टीका पडळकरांनी केली. आमदार सुरेश खाडे यांच्याविरोधात मिरज पूर्वभागातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उठवून बसवण्यात काकांचा हात असल्याचा सूर उमटू लागला. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गटाला बाजूला करण्याची खेळी ते करत असल्याची कुजबूज सुरू झाली. जतमध्ये विलासराव जगताप आणि कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे यांना पुढे येऊ द्यायचे नाही, यासाठी काकांनी ‘फिल्डिंग’ लावल्याचेही बोलले जाऊ लागले.
या पार्श्वभूमीवर २०१९च्या लोकसभा निवणुकीवेळी भाजपकडेही काकांसारखा जिल्हाभर चालणारा, वजनदार उमेदवार नव्हता. परिणामी काकांनाच उमेदवारी मिळाली. ती भाजपची अपरिहार्यता होती. काँग्रेस आघाडीकडून विशाल पाटील आणि भाजप सोडून ‘वंचित’मध्ये गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी दंड थोपटले. तिहेरी लढतीत काकांनी गड राखला. त्यावेळी काकांवर नाराज झालेल्या भाजपमधील नेत्यांना कसेबसे विनवण्यात आले. मात्र त्या आधीपासूनच काकांना पद्धतशीर बाजूला काढण्यात येऊ लागले होते. जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय त्यांना डावलून घेतले जाऊ लागले. महापालिका निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसले. दुसरीकडे पक्षाच्या कार्यक्रमांना काका दांडी मारू लागले. काही बैठकांना नावापुरती हजेरी लावू लागले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी सोयीस्कर भूमिका घेतली. अजितराव घोरपडेंना भाजप सोडून शिवसेनेची उमेदवारी घेऊन लढावे लागले, पण काकांमुळे त्यांची ‘गेम’ झाली, तर जतमध्ये विलासराव जगतापांच्या विरोधातील बंडाळीला काकांनीच फूस लावल्याने तीही जागा गेली. प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांसह पक्षातील इतर नेत्यांशी असलेली मतभेदांची दरी रूंदावली.
याच दरम्यान राज्यात भाजपची सत्ता जाऊन काॅंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाआघाडीची सत्ता आली. आधीच काकांचे काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मधूर संबंध आहेत. ते आणखी घट्ट होऊ लागले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली आहे, तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील गटाशी त्यांची छुपी युती आहे. काकांनी पक्षाच्या संघटनवाढीत कधीच रस दाखवला नाही. उलट प्रत्येक तालुक्यात स्वत:चा गट वाढवण्यावर भर दिला. यामुळे पक्षात अस्वस्थता वाढल्याचे बोलले जाते. यामुळे त्यांना पर्याय देण्याच्या विचारात भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. लोकसभेसाठी नवा चेहरा देण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत.
‘पदवीधर’वेळी पृथ्वीराज देशमुख होते कोठे?
पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना देण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी परस्पर घेतला. त्यावेळी काकांसह इतर नेत्यांनाही विचारले गेले नाही. त्यातून खदखद वाढत गेली. काही नेते अलिप्त राहिले, तर काहींनी विरोधात काम केल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. या चर्चेचा रोख काकांकडेही आहे. यावर काकांचे समर्थक म्हणतात, ‘निवडणुकीतील प्रचारादरम्यान संग्रामसिंह यांचे चुलत बंधू तथा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख जाहीर प्रचारात कोठेच दिसले नाहीत. त्यांच्या साखर कारखान्याचा गंभीर प्रश्न समोर येणार असल्यानेच त्यांना मागे ठेवले होते का? मग पराभवाचे खापर केवळ आमच्यावरच का? फोडता?’ हा रोकडा सवाल. यातून दोन्ही गटातील उभा दावा पुन्हा अधोरेखित होत नाही का?