सांगलीत १० पासून षोडशकरण, दशलक्षण पर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:50 PM2018-09-06T12:50:56+5:302018-09-06T13:00:03+5:30
दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सुरू आहे.
सांगली : दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सुरू आहे.
या मंगलमय पुण्यकाळातील चातुर्मासामध्ये १० ते २६ सप्टेंबरपर्यंत षोडशकरण व दशलक्षण पर्वाचा विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्वर्ण संयम दीक्षा महामहोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष, चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील व संयोजन प्रमुख तात्याभैया नेजकर यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.
त्यांनी सांगितले की, संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्यांचे संयम स्वर्ण वर्षायोग सुरू आहे. आता चातुर्मासात षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीतील नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला असून यात विविध कार्यक्रम व धार्मिक अनुष्ठान होत आहे.
दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत सम्यकज्ञान संस्कार वर्ग, दुपारी समयसार, छहढाला, इष्टोपदेश, रत्नकरंडक श्रावकाचार व सायंकाळी आचार्य भक्ती व शंका समाधान हे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ज्येष्ठ मुनिश्री नियमसागरजी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात प्रथमच असे भव्य व फिरते समवशरण होत आहे. षोडशकरण व दशलक्षण पर्वामध्ये सुमारे पाच हजार लोक या समवशरणामध्ये बसून पूजन व मुनिश्रींच्या प्रवचनाचा लाभ घेणार आहेत. तरी या संधीचा लाभ सांगलीसह परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहनही पाटील आणि सहकाऱ्यांनी केले आहे.
मुख्य संयोजक प्रशांत पाटील मजलेकर, राजकुमार चौगुले, अभयकुमार बरगाले, आप्पासाहेब पाटील, सुहास पाटील, प्रवीण वाडकर, डॉ. मनोज पाटील, शीतल वळवडे यांच्या संयोजनाखाली कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे.
तीर्थंकरांवर पुष्पवृष्टी होणार...
१० सप्टेंबरपासून सुरू होणाºया षोडशकरण व दशलक्षण पर्वामध्ये २७ फूट उंचीच्या भव्य फिरत्या, मनमोहक समवशरणाची रचना होणार आहे. यामध्ये साडेपाच फूट उंचीचे तीर्थंकर भगवंताच्या चार सुबक मूर्ती बसविण्यात येणार आहेत. या समवशरणामध्ये सहा विमानांची विशेष रचना करण्यात आली असून इंद्र-इंद्रायणी या विमानामध्ये बसून तीर्थंकरांवर पुष्पवृष्टी करणार आहेत.