कुपवाडमध्ये उद्यापासून शूटिंग बॉल स्पर्धा
By admin | Published: January 15, 2015 11:16 PM2015-01-15T23:16:17+5:302015-01-15T23:19:57+5:30
५१ हजारांची बक्षिसे : नामांकित खेळाडूंचा सहभाग
सांगली : कुपवाड (ता. मिरज) येथे प्रा. शरद पाटील स्पोर्टस् क्लबतर्फे राज्यस्तरीय महिलांच्या शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक राजकुमार पवाळकर यांनी दिली.
कुपवाडमध्ये प्रथमच या राज्य पातळीवरील स्पर्धा होत आहेत. १७ व १८ जानेवारी रोजी या स्पर्धा होतील. १७ रोजी सायंकाळी पाच वाजता देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेस प्रारंभ होईल. स्पर्धेचे उद्घाटन माजी आ. प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेत गोवा, कर्नाटक, पुणे, वर्धा, कुपवाड, अहमदनगर, नाशिक, यवतमाळ आदी नामांकित संघ सहभागी होणार आहेत. एक ते चार क्रमांकांच्या विजेत्या संघांसाठी अनुक्रमे ११, ९, ७ व ५ हजारांचे रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पाच ते नऊ क्रमांकांसाठी प्रत्येकी तीन हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना वुमन आॅफ टुर्नामेंट, उत्कृष्ट शूटर व उत्कृष्ट नेटमन आदी किताबांनी गौरविण्यात येणार आहे. खेळाडूंच्या निवास व भोजनाची सोय क्लबतर्फे करण्यात आली आहे.
पारितोषिक वितरण १८ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या स्पर्धा विद्युतझोतात होणार आहेत. त्यासाठी अद्ययावत क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धा समितीचे अध्यक्ष शंकर कोकरे व सचिव नरसगोंडा पाटील यांनी आज स्पर्धा स्थळाची पाहणी केली.
यावेळी राजकुमार पवाळकर, महावीर पाटील, झाकीर मुजावर, मुरलीधर कांबळे, प्रेमकुमार नायर, सचिन पाटील उपस्थित होते.