निर्बंध झुगारून मिरजेतील दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:20 AM2021-07-20T04:20:06+5:302021-07-20T04:20:06+5:30
ओळ : मिरज येथे साेमवारी ‘मी मिरजकर’ फाैंडेशन व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. ...
ओळ : मिरज येथे साेमवारी ‘मी मिरजकर’ फाैंडेशन व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत ‘मी मिरजकर’ फाैंडेशन व व्यापारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी सकाळी शहरातील सर्व दुकाने सुरू केली. मात्र महापालिका व पोलिसांनी रस्त्यावर उतरत थेट कारवाईचा इशारा दिला. अखेर प्रशासनाच्या कठोर पवित्र्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा बंद केली.
मिरजेत सर्व व्यापारी, दुकानदार, रिक्षा संघटनांसह शहरातील प्रमुख संस्था-संघटनांच्या बैठकीत सोमवारपासून सर्व व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्यानुसार ‘मी मिरजकर’ फौंडेशनचे सुधाकर खाडे, महादेव कोरे, शीतल पाटोळे, प्रशांत लोखंडे, श्रीपाद आचार्य, व्यापारी संघटनेचे गजेंद्र कुल्लोळी यांनी सोमवारी सकाळी व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. यानंतर हायस्कूल रस्त्यावरील कापड दुकानांसह शहरातील अनेक भागात दुकाने सुरू झाली. यामुळे प्रशासन व व्यापाऱ्यांत संघर्षाची चिन्हे होती. मात्र दुपारी फौंडेशनचे कार्यकर्ते निघून गेल्यावर महापालिकेचे अधिकारी व पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी कारवाईचा इशारा दिला. प्रशासनाने सकाळपासून उघडलेल्या दुकानांचे व्हीडीओ चित्रीकरण केले.
प्रशासनाच्या कठोर पवित्र्यामुळे व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद केली. जिल्ह्यात निर्बंध कायम असताना व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र दुपारनंतर नरमाई घेत दुकाने पुन्हा बंद केली.
चौकट
थाेडी सहनशीलता दाखवा
साेमवारी सकाळी ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती, त्यांना सूचना केल्यानंतर सर्वांनी पुन्हा दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांनी कोणाचे ऐकून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने हे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी थोडी सहनशीलता दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.