मिरज कोविड रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:26 AM2021-04-17T04:26:33+5:302021-04-17T04:26:33+5:30
मिरज : कोविड साथीमुळे एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाची परीक्षा पुढे गेल्याने मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची टंचाई आहे. ...
मिरज : कोविड साथीमुळे एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाची परीक्षा पुढे गेल्याने मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची टंचाई आहे. सध्या प्रशिक्षण कालावधी संपलेल्या डाॅक्टरांनाच आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.
मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे ३७५ खाटांची व्यवस्था आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी येथे प्रशिक्षणार्थी निवासी पदव्युत्तर व प्राध्यापक असे १६० डाॅक्टर काम करीत आहेत. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी १५० विद्यार्थी वैद्यकीय पदवी घेतात. मात्र या वर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एमबीबीएस परीक्षाच झालेली नाही. साडेचार वर्षे वैद्यकीय शिक्षण घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात एक वर्ष प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे. कोरोना साथीच्या काळात सध्या प्रशिक्षणार्थी वैद्यकीय विद्यार्थांची आवश्यकता आहे. मात्र या वर्षी एमबीबीएस परीक्षा पुढे गेल्याने हे विद्यार्थी घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना डाॅक्टरांची कमतरता होऊ नये यासाठी सध्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची आणखी एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे सध्याच्या १५० प्रशिक्षणार्थींपैकी ६० ते ७० विद्यार्थी कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी उपलब्ध होतील, असे अधिष्ठाता डाॅ. नणंदकर यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना संसर्गाचाही धोका आहे. गतवर्षी कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या शंभरावर डाॅक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी विलगीकरणात पाठवावे लागले. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कोविड रुग्णालयात डाॅक्टरांची संख्या अपुरी पडत असताना या वर्षी वैद्यकीय परीक्षा पुढे गेल्याने प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मिळविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला धावपळ करावी लागणार आहे.
चाैकट
मिरज कोविड रुग्णालयात सुमारे चारशे रुग्णांसाठी १७ वाॅर्ड असून त्यापैकी सहा अतिदक्षता विभाग आहेत. डाॅक्टरांना सहा तासांची ड्युटी असून प्रत्येक वाॅर्डात चोवीस तासांसाठी ४ डाॅक्टर व पर्यायी व्यवस्था म्हणून २ डाॅक्टर असे सहा जण काम करतात. डाॅक्टरांना सात दिवस काम केल्यानंतर तीन दिवस सुटी देण्यात येते. अतिदक्षता विभागात प्रत्येक तासाला तीन डाॅक्टरांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी बीएएमएस डाॅक्टरांचीही येथे नियुक्ती करण्यात येणार आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात औषधविज्ञान शास्त्र विभागाचे प्राध्यापक, डाॅक्टर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या केवळ २० आहे. मात्र कोविडच्या आणीबाणीच्या परिस्थितीत सर्व विभागातील प्राध्यापक डाॅक्टर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन कोविड उपचारासाठी नियुक्त करण्यात आले आहे.