इस्लामपुरात शिवीगाळ, तोडफोड
By admin | Published: March 28, 2016 11:40 PM2016-03-28T23:40:41+5:302016-03-29T00:21:05+5:30
रंगपंचमीला गालबोट : उरुण परिसरात वाहनांच्या काचा फोडल्या
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात नेहमी शांततेने साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीच्या रंगारंग उत्सवाला आज गालबोट लागले. उरुण परिसरात अनोळखींच्या वाहनाची तोडफोड, रिक्षाचालकाला मारहाण, तर शिरटे येथे एका युवकाला रंग लावण्याच्या कारणावरुन शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दुपारनंतर कारवाईचा बडगा उगारत २० दुचाकीस्वारांसह रंग खेळताना हुल्लडबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.
शहरात आज सकाळपासून लहान मुले वगळता इतरांनी पाण्याच्या वापराला फाटा देत रंगांची उधळण करीत कोरडी रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली. युवकांचे जथ्थे रंगलेल्या चेहऱ्यांनी दुचाकीवरुन रपेट मारत असल्याचे दिवसभर दिसत होते. शहरातील विविध चौका-चौकात त्या परिसरातील युवक रंगपंचमीचा हा आनंद लुटत होते.
सकाळपासून शांततेत आणि उत्साहात सुरु असणाऱ्या या रंगपंचमीला दुपारनंतर उरुण परिसरात गालबोट लागले. प्रदीप सर्जेराव पाटील (रा. पाटील गल्ली) याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तो आपल्या रिक्षातून हे साहित्य घेऊन जात असताना हर्षद दिलीप देसाई, योगेश पवार, वैभव अधिकराव पवार, निखिल फार्णे व इतरांनी त्याला अडवून धक्काबुक्की व शिवीगाळ करीत रंग फासला. त्यानंतर त्याच्या साहित्यावर रंगाचे पाणी ओतून नुकसान केले. याचवेळी तेथून जाणाऱ्या एका अनोळखी युवकाच्या कारच्या मागील काचेची तोडफोड केली. या प्रकारामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश देत तरुणाईचा या बेभान उत्साहाला त्यांनी चाप लावायला सुरुवात केली. सायंकाळपर्यंत ट्रिपल सीट जाणाऱ्या २0 दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. गांधी चौकात मोठ्या आवाजात स्पिकर लावून गोंधळ माजवणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या शालेय शिक्षणात अडथळे येऊ नयेत म्हणून काही काळ स्थानबध्द केल्यानंतर ताकीद देऊन सोडून देण्यात आले. (वार्ताहर)