शिकारी टोळीकडील छोेटे बॉम्ब जप्त
By admin | Published: December 4, 2014 12:47 AM2014-12-04T00:47:03+5:302014-12-04T00:49:37+5:30
मिरजेतील घटना : संशयित मध्य प्रदेशातील टोळीचा सदस्य
मिरज : प्राण्यांच्या शिकारीसाठी छोट्या बॉम्बचा वापर करणाऱ्या मध्य प्रदेशातील शिकारी टोळीतील दीपक गिल्ली (वय ५०, रा. ललतपूर, जि. कटनी) यास वन विभागाने अटक केली. गिल्ली याच्याकडून ५० छोटे बॉम्ब, चंदन, कुऱ्हाडी, प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे पिंजरे जप्त करण्यात आले.
मध्य प्रदेशातून आलेल्या शिकारी टोळीने मिरज रेल्वे स्थानकाच्या आवारात वास्तव्य केले होते. आपटबारच्या आकाराचे बॉम्ब रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येतात. गेले दोन दिवस जडीबुटी विक्रीच्या निमित्ताने शिकारी टोळीचे मिरजेत वास्तव्य होते. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी टोळीतील सदस्य पळून गेले; मात्र दीपक गिल्ली हा सापडला. गिल्ली याच्याकडून जनावरांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे ६६ बॉम्ब, दोन कुऱ्हाडी, दोन किलो चंदन, लहान-मोठे पक्षी व प्राणी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे पिंजरे, बनावट कस्तुरीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या. दीपक गिल्ली याने सल्फर अमोनियम नायट्रेटचा वापर करून प्राण्यांना मारण्यासाठी स्फोटके तयार केल्याची कबुली दिली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार दीपक गिल्ली यास अटक केल्यानंतर त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली. (वार्ताहर)