पाण्याच्या टाकीवर चढून आता आंदोलन करावे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:24 PM2020-12-24T19:24:49+5:302020-12-24T19:27:09+5:30
water shortage Sangli -सांगली महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. उपनगरात तर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आम्हीही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे का? अशा शब्दांत बुधवारी ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. महापौर गीता सुतार यांनी पंपिंग वाढवून लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली.
सांगली : महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. उपनगरात तर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आम्हीही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे का? अशा शब्दांत बुधवारी ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. महापौर गीता सुतार यांनी पंपिंग वाढवून लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली.
महापालिकेच्या सभेत नगरसेविका नसीमा नाईक यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. शामरावनगरमधील पाण्याबाबत नागरिक, महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले, तेव्हा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. पण आठवडा लोटला तरी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
भाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले की, सदस्यांनी आंदोलन करूनही प्रश्न सुटत नाहीत हे गांभीर्याने घेतले पाहिजे. यामुळे लोकांच्या रोषाला सदस्यांना सामोरे जावे लागते. खालची यंत्रणा काम करत नाही. अधिकाऱ्यांना अभ्यास नाही, थातूरमातूर उत्तरे देतात, असा आरोप केला.
विश्रामबाग, वारणाली परिसरासाठी पाण्याची टाकी बांधण्याच्या निर्णयाला महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ पाण्याच्या टाक्या उभारून काय उपयोग? टाक्या असल्या तरी पाणीपुरवठा का होत नाही, असा सवाल नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील यांनी उपस्थित केला. माने यांनी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने पाण्याचे नियोजन होत नसल्याचा आरोप केला.
पाण्याच्या टाक्या असूनही उपसा यंत्रणा सक्षम नसल्याने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे संतोष पाटील म्हणाले. त्यात सुधारणा झाली नाही तर आम्हालाही टाक्यांवर चढून आंदोलन करावे लागेल असे ते म्हणाले. यावर पंपिंग वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश महापौर सुतार यांनी दिले.
आयुक्तांचा रोष
आयुक्त कापडणीस यांनीही अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. ते म्हणाले, आयुक्त उत्तरे देतात म्हणून अधिकारी निष्काळजी झाले आहेत. ते गाफील राहतात. विभाग प्रमुख, सहायक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागाच्या बैठका घेतल्यावर बरेचसे प्रश्न सुटतील. त्यांनी अभ्यास करावा, अशी सूचना केली.