कोल्हापुरात एकच जल्लोष; तरुणाई रस्त्यावर
By admin | Published: June 5, 2017 01:26 AM2017-06-05T01:26:56+5:302017-06-05T01:26:56+5:30
कोल्हापुरात एकच जल्लोष; तरुणाई रस्त्यावर
कोल्हापूर : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रविवारी झालेल्या साखळी सामन्यात पराभव केला. या विजयानंतर कोल्हापुरातील शिवाजी चौकात रात्री क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, सोन्या मारुती चौक, साकोली कॉर्नर, अकबर मोहल्ला, क्रशर चौक, आदी चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.
रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना झाला. यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४८ षटकांत ३ बाद ३१९ धावा केल्या. ३१९ धावांचे आव्हान घेऊन खेळणाऱ्या पाकिस्तानसमोर मोठ्या लक्ष्यासह पावसाचाही व्यत्यय आला. सामना उशिरा सुरू झाल्याने पाकिस्तानसमोर डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे कमी षटकांत जादा धावांचे आव्हान ठेवण्यात आले. पाकिस्तानचे एक एक फलंदाज जसजसे पॅव्हेलियनकडे परतू लागले तसा कोल्हापूरच्या तरुणाईला जोर चढू लागला. यात अनेक तरुणांनी सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलवरून शहराच्या मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारण्यास सुरुवात केली. रात्री साडेअकरानंतर भारताने सामना जिंकल्यानंतर शिवाजी चौक येथे तरुणांनी एकच जल्लोष केला. यावेळी गाड्यांचे सायलेन्सर काढलेले तरुण भारताच्या विजयाच्या घोषणा देत फिरत होते. गुजरी, शिवाजी पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शनिवार पेठ, मंगळवार पेठ, सानेगुरुजी, आदी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी युवकांच्या हाती तिरंगा ध्वज होता.
के.एम.टी बसथांब्याचे छत कोसळले
शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यासाठी युवकांची गर्दी झाल्यानंतर या गर्दीचे मोबाईल चित्रीकरण करण्यासाठी काही युवक के.एम.टी बसथांब्यावर चढले. पत्र्यावर जादा भार झाल्यानंतर पत्र्यासह युवक कोसळले. त्यात पाचजण जखमी झाले. जखमी झालेल्या युवकांना उपस्थितांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.