सांगली महापालिकेच्या शहर अभियंत्यासह चौघांना 'कारणे दाखवा' नोटीस
By शीतल पाटील | Published: September 19, 2022 07:39 PM2022-09-19T19:39:54+5:302022-09-19T19:40:44+5:30
महापालिकेत आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारल्याने शहर अभियंत्यासह चार वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले आहेत.
सांगली : महापालिकेत आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारल्याने शहर अभियंत्यासह चार वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले आहेत. आयुक्त सुनील पवार यांनी या अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावत २४ तासात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. शहर अभियंता संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, ड्रेनेज विभागाचे प्रमुख परमेश्वर हलकुडे, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक अशी नोटीस बजावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. आयुक्तांनी थेट कारवाईचा बडगा उगारल्याने या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत येत्या पंधरवड्यात महापालिकेच्या विविध विभागांत प्रलंबित असणाऱ्या कामांचा निपटारा केला जाणार आहे. शासनाकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता नोंदी, नवीन नळजोडणी, मालमत्ता करांची आकारणी व मागणी पत्र पाठविणे आदींसह विविध विभागांकडील तक्रारींची निर्गती करून त्याचा अहवाल १० ऑक्टोबरला शासनाला सादर करायचा आहे.
या सेवा पंधरवड्याबाबत शुक्रवारी आयुक्त पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आयुक्त कार्यालयातून सर्व खातेप्रमुखांना बैठकीचा निरोपही देण्यात आला होता. या बैठकीला संजय देसाई, रवींद्र ताटे, परमेश्वर हलकुडे, गिरीश पाठक हे चौघे खातेप्रमुख गैरहजर होते. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी चौघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निरोप देऊनही गैरहजर राहिल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत २४ तासात खुलासा करावा. खुलासा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.