वाळवा-शिराळ्यात खासदार दाखवा अन्..! पुन्हा फिरकलेच नाहीत; निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यांचा विसर पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:13 AM2019-12-28T00:13:41+5:302019-12-28T00:14:14+5:30
माने यांच्यारुपाने तरुण आणि नवीन चेहरा मतदारसंघाला मिळाला, यामुळेच तरुण वर्गाने हिरीरीने मतदान करुन निवडून दिले. परंतु माने निवडणुकीच्या प्रचारासाठी आले तेवढेच. त्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे येथे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले, माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने प्रचारासाठी वाळवा आणि शिराळा तालुक्यांत आले, मात्र विजय मिळवल्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे ‘खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा’ असे बोलले जात आहे.
वाळवा-शिराळा तालुक्यांत चार अपवाद वगळता खासदारांची नेहमीच आयात करावी लागली आहे. वाळवा-शिराळा क-हाड लोकसभा मतदार संघात असताना आनंदराव चव्हाण, प्रमिलाकाकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्यात आले होते. हे तालुके हातकणंगले मतदार संघात गेल्यानंतर निवेदिता माने, राजू शेट्टी यांनी प्रतिनिधीत्व केले. २0१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याविरोधात कोण, हा प्रश्न भाजप-शिवसेना युतीपुढे होता. अंतिम टप्प्यात हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले धैर्यशील माने यांना शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली.
माने यांच्यारुपाने तरुण आणि नवीन चेहरा मतदारसंघाला मिळाला, यामुळेच तरुण वर्गाने हिरीरीने मतदान करुन निवडून दिले. परंतु माने निवडणुकीच्या प्रचारासाठी आले तेवढेच. त्यानंतर त्यांना दोन्ही तालुक्यांचा जणू विसरच पडला आहे. त्यामुळे येथे खासदार दाखवा अन् हजार रुपये मिळवा, असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.
राजकीय समीकरणे बदलली
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात भाजप-शिवसेना होती. माने यांच्या प्रचारासाठी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाडिक गटाने प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे पालटली आहेत. जे लोकसभेला विरोधात होते, ते आता विधानसभेत हातात हात घालून राज्यकर्ते बनले आहेत. त्यामुळे आता अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार मानसिंगराव नाईक एकत्र येऊन भाजपविरोधी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.