विश्वासघातक्यांना जागा दाखवा
By Admin | Published: February 16, 2017 11:14 PM2017-02-16T23:14:29+5:302017-02-16T23:14:29+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : पिंपोडे बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा; शासनाने जगणे अवघड केले
वाठार स्टेशन : ‘सध्याच्या शासनाने सर्वसामान्यांचे जगणे अवघड करुन टाकले आहे. अशावेळी सत्तेच्या लालसेपोटी विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवून द्यावी,’ असे आवाहन राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथे पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मंगेश धुमाळ, पिंपोडे बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय साळुंखे, देऊर पंचायत समिती गणाच्या उमेदवार साधना बनकर, बाळासाहेब सोळस्कर, सभापती अजय कदम, सभापती शहाजी भोईटे, जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, सुरेशराव साळुंखे, विकास साळुंखे, नागेश जाधव, राजूकाका भोसले, शाहूराज फाळके, नीलेश जगदाळे, ललित मुळीक, अजित भोईटे, संभाजीराव धुमाळ, दत्तात्रय धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘आत्ताच्या सरकारने अडीच वर्षांत सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्कील केले आहे. नोटाबंदीच्या परिणामाने अनेक उद्योग बंद पडले, अनेक तरुण बेरोजगार झाले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला दर नाही, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दबली आहे. शहरी भागात मतदार संघ वाढले आहेत. यामुळे या सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत शहरी मतदारांना खूश करण्याची भूमिका घेतली आहे. मुळात या शासनाला शेतकरी नको तर व्यापारी जगवायचा आहे.,’ असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब सोळस्कर म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सध्याच्या कोणत्याच राजकीय पक्षात विकासाची दिशा नाही. सध्याचे भाजप-सेना सरकार हे शेतकरी विरोधी आहे.’ (वार्ताहर)