बोरगावमधील परिचारिकांना कारणे दाखवा नाेटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:00+5:302021-04-28T04:30:00+5:30
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन पातळीबाबत चुकीची माहिती देणाऱ्या त्या परिचारिकांना प्रशासनाने कारणे ...
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन पातळीबाबत चुकीची माहिती देणाऱ्या त्या परिचारिकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या घटनेबाबत त्यांच्याकडून खुलासा घेऊन कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बोरगावमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. त्यातील काही रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. या रुग्णांच्या तपासणीसाठी गुरुवारी चार परिचारिका महिला आल्या होत्या. रुग्णांची ऑक्सिजन पातळी दोनवेळा तपासण्यात आली, मात्र तिथे असणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबातील कुणालाही ऑक्सिमीटरवरील नोंद दाखवण्यात आली नाही. रुग्णांची ऑक्सिजन पातळी ८५-८६ इतकी खालावली आहे. त्यांना तातडीने ऑक्सिजन बेड मिळवून उपचारासाठी दाखल करा, असे सांगून या परिचारिका निघून गेल्या. त्यामुळे रुग्णांचे कुटुंबे काहीकाळ हतबल झाले होते.
डुडी हे मंगळवारी आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी या विषयाची माहिती दिल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांना संबंधित परिचरिकांचे जबाब नोंदवून चुकीचे काम करणाऱ्या परिचारिकांवर कारवाई करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बोरगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना साळुंखे या उद्या परिचारिकांचे जबाब नोंदवून घेणार आहेत.