Women's Day Special: अपघातामुळे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ, पण सांगलीतील श्रद्धाने जिद्दीने घेतली फिनिक्स भरारी
By संतोष भिसे | Updated: March 8, 2025 17:06 IST2025-03-08T17:06:43+5:302025-03-08T17:06:57+5:30
तिच्या जिद्दीची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही घ्यावी लागली

Women's Day Special: अपघातामुळे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ, पण सांगलीतील श्रद्धाने जिद्दीने घेतली फिनिक्स भरारी
संतोष भिसे
सांगली : सांगलीतील श्रद्धा सुदर्शन सदामते हिला वयाच्या ऐन उमलत्या काळात एका भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. तिच्या डोक्याला लागलेला मार थेट मेंदूपर्यंत पोहोचला. मणक्याला आणि मेंदूला मार लागला. अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ आली. मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेसाठी डोक्याचे सारे केस कापून टाकवे लागले. लांबसडक केशसंभार म्हणजे स्त्रीच्या सौंदर्याचा मानबिंदू, पण त्यालाच कात्री लागल्याने श्रद्धाच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल, याची कल्पना न केलेली बरी. त्यावर जिद्दीने मात करीत तीने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.
पण त्यानंतर तिचे केस इतके भराभर वाढले, की तिच्या उंचीपेक्षा केसच लांबसडक झाले. आजतागायत तिने एकदाही केसांना कात्री लावलेली नाही. बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविले. पुढे वास्तुविशारद शाखेत प्रवेश मिळविला. डिग्री मिळविली. पुण्यात जावून मास्टर्स पदवीलाही गवसणी घातली. अंगभूत कलानैपुण्याला शिक्षणाची जोड मिळाली. आज पुण्यात तिची स्वत:ची आर्किटेक्ट फर्म आहे. आपल्या देखण्या वास्तुविशारद कामातून अनेक नॅशनल, मल्टीनॅशलन पुरस्कारांना तिने गवसणी घातली आहे. पेंटिंग आणि कॅलिओग्राफीचा छंदही तिने जोपासला आहे. तिच्या जिद्दीची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सलाही घ्यावी लागली आहे.
ती म्हणते, अपघातानंतर एकेक केस वाढवताना मरणयातना अनुभवल्या. या कसोटीच्या काळात कुटुंबीयांनी दिलेले पाठबळ आणि मनोधैर्य यामुळेच पराभूत मानसिकतेतून बाहेर पडू शकले. नव्याने मिळालेल्या आयुष्याचा काही भाग तिने आता समाजसेवेसाठी राखून ठेवला आहे. केअरिंग हॅण्डस या पुण्यातील संस्थेमार्फत ती अनाथ मुलांसाठी काम करतेय. छोट्या छोट्या संकटांतून खचून जाणाऱ्या आणि हार मानणाऱ्या मुलींसाठी श्रद्धा म्हणजे एक जिवंत प्रेरणादायी उदाहरण आहे.
आरसेदेखील झाकून ठेवले
अपघातातून सावरायला व जखमा पूर्णत: बऱ्या व्हायला श्रद्धाला दीड वर्ष लागले. आपला विद्रूप चेहरा पाहायलादेखील नको म्हणून तिने तब्बल दीड वर्षे आरसाच पाहिला नाही. कुटुंबीयांनीही तिची मानसिकता लक्षात घेऊन घरातील सर्व आरसे झाकून ठेवले. पण या संकटावरही तिने मात केली. केस नसलेले डोके घेऊन फिरायला नको म्हणून ती डोक्यावर कापड झाकून कॉलेजला जायची, परीक्षेला बसायची.