Coronavirus in Maharashtra ११८४ प्रवासी आनंदी, निघाले आपल्या गावी : मिरजेतून गोरखपूरला श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:14 PM2020-05-11T12:14:09+5:302020-05-11T12:17:02+5:30
ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली होती.
मिरज : उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी रविवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाली. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते कामगारांना रेल्वे तिकिटे व भोजन देण्यात आले. प्रत्येक बोगीत ५२ प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ११८४ प्रवासी या रेल्वेतून रवाना झाले.
सायंकाळपासून परप्रांतीय प्रवाशांना बसमधून रेल्वे स्थानकाकडे आणण्यात आले. एका बसमध्ये पंचवीस प्रवासी, याप्रमाणे दोन बसेसना एका नोडल अधिका-याची नियुक्ती करण्यात आली होती. १६ नोडल अधिका-यांनी ३२ बसेसमधून नोंदणीकृत ११८४ प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणले. स्थानिक पोलिसांचा रेल्वे स्थानकाबाहेर बंदोबस्त होता. महसूल अधिका-यांनी रेल्वे स्थानकात प्रवेशापूर्वी प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी केली. ओळखपत्र नसल्याने, तसेच तापमान जास्त असल्याने काहीजणांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस बंदोबस्तात सर्वांना रेल्वे बोगीत बसविण्यात आले. नोंदणी केलेल्या कामगारांशिवाय कोणीही रेल्वेत घुसणार नाही, याची खबरदारी रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने घेतली होती.
प्रवाशांना रेल्वे तिकिटासोबत दोन पाण्याच्या बाटल्या व जेवणासह पुढील ३० तासांच्या प्रवासासाठी गूळपोळी, थालीपीठ देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजित देसाई, पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील यांच्यासह पोलीस व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. गोरखपूरसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असून, मिरजेतून रविवारी पहिली रेल्वे रवाना झाली. मंगळवारी दुसरी रेल्वे पाठविण्याची तयारी सुरु आहे. थेट गोरखपूरपर्यंत जाणारी रेल्वे वाटेत कोठेही थांबणार नाही किंवा कोणत्याही प्रवाशाला वाटेत उतरू देणार नाही. उत्तर प्रदेशातील अन्य जिल्ह्यातील प्रवाशांना गोरखपूर येथून अन्यत्र पाठविण्याची सोय करणार आहे.
विश्वजित कदम यांचा पुढाकार
जिल्ह्यात हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी उत्तर भारतीयांची संख्या मोठी असल्याने गोरखपूरपर्यंत मिरजेतून दोन विशेष रेल्वेंचे प्रशासनातर्फे नियोजन केले आहे. विशेष रेल्वेची प्रत्येकी साडेनऊ लाख रुपये खर्चाची व्यवस्था मंत्री विश्वजित कदम यांनी केल्याने मजुरांना दिलासा मिळाला. मंत्री विश्वजित कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम यांनी प्रवाशांची विचारपूस केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार परप्रांतीयांच्या रेल्वे तिकिटाची व भोजनाची व्यवस्था केल्याचे कदम यांनी सांगितले.