Sangli- दुष्काळाने शेतकरी धास्तावला.. नेत्यांचा मात्र श्रेयवाद रंगला; जत तालुक्यातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 04:21 PM2023-09-15T16:21:57+5:302023-09-15T16:22:25+5:30
लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेने शेतकरी निराश
दरीबडची : मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जत तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला आहे. शासनाच्या कागदी घोड्यांमुळे दुष्काळाचे भयावह चित्र जाहीर झाले नाही. दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतकरी धास्तावला आहे. दुष्काळी झळा जाणवत असताना, नेत्यांमध्ये मात्र म्हैसाळचे पाणी तलावात सोडल्याच्या श्रेयवादाची स्पर्धा लागली आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांवर निराशेचे ढग दाटले आहेत.
पूर्व भागात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे सरासरी क्षेत्रापैकी केवळ ५१.६ टक्के क्षेत्रावरच पेरा झाला आहे. उगवण झालेले कोंब वाळून गेले. तालुक्यात गाई, बैल, म्हैशी, शेळ्या-मेंढ्या अशा एकूण ३ लाख ४९ हजार ८९५ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे. सध्या तीन हजार २०० रुपये टनने ऊस विकत घेऊन पशुधन जगविले जात आहे. पशुधन जगविण्याची चिंता लागून राहिली आहे.
तालुक्यात ८७.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ओढे, विहिरी, तलावांतील पाणी पातळीने तळ गाठला आहे. २७ तलावांपैकी १७ तलाव कोरडे आहेत. सध्या ४१९.०२ द.ल.घ.फू. पाणीसाठा म्हणजे फक्त ३ टक्के पाणीसाठा आहे. पाऊस पडला नाही, तर द्राक्ष बागांची छाटणी घ्यायची कशी? या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे.
खासदार, आमदार, विरोधी पक्ष शासन दरबारी दबाव आणण्यात व वस्तुस्थिती मांडण्यात कमी पडले आहेत. याउलट लहान, मोठ्या कामांत फोटोसेशन करून श्रेयवाद लाटण्यासाठी नेत्यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर स्पर्धा सुरू आहे. लोकप्रतिनिधींचे दुष्काळाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
विस्तारित जत पूर्व भागात म्हैसाळ योजना मार्गी लावण्यासाठी, तुबची बबलेश्वर योजनेचे राज्य करार करण्यासाठी व दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.
२५ गावात टँकरने पाणी
सध्या २५ गावांना २९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती आहे. १९७२ पेक्षा भीषण अशी दुष्काळी परिस्थिती आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको, उपोषण केले आहे. परंतु, अद्याप दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झालेले नाही.
‘प्रशासनाने तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवावा. जनता रस्त्यावर येण्याआधी जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, रोजगाराचा प्रश्न मार्गी लावा. वीजबिले माफ करावीत. चारा छावण्या सुरू कराव्यात.’ - प्रवीण आवरादी, जत विधानसभा अध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट)