शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

By संतोष भिसे | Published: October 8, 2022 08:39 PM2022-10-08T20:39:05+5:302022-10-08T20:43:33+5:30

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

Shubhangi Patil and Divyang Kajal Kamble climb on Bhairavgad, a very difficult climb | शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

शुभांगी पाटील आणि दिव्यांग काजल कांबळेची भैरवगडावर स्वारी, अत्यंत अवघड शिखरावर चढाई

Next

सांगली : सह्याद्री खोऱ्यातील गिर्यारोहणासाठी कठीण श्रेणीत असलेला मोरोशीचा भैरवगड सांगलीच्या शुभांगी पाटील व दिव्यांग काजल कांबळे यांनी सर केला. ४०० फूट उंच शिखरावर यशस्वी चढाई करत नवरात्रीमध्ये स्त्रीशक्ती दाखवून दिली.

भैरवगड सर करणारी काजल पहिलीच दिव्यांग महिला ठरली. तिने यापूर्वी वजीर, हिरकणी कडा अशा अवघड व साहसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. मोरोशी (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथून त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. घनदाट जंगलातून दोन तासांच्या पायपिटीनंतर भैरव माचीला पोहोचले. तेथून खिंडीपर्यंत खडी चढाई केली. गडावर जाण्यासाठी कातळकड्यावरील कोरीव पायऱ्यांवरुन वाटचाल केली. पुढे निसरडा मार्ग, एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा जीवघेण्या स्थितीत चढाई सुरु ठेवली. पुढे निवडुंगाच्या जाळीतून पूर्व- पश्चिम पसरलेल्या अरुंद गडमाथ्यावर पोहोचले.

काजल, शुभांगी आणि सहकाऱ्यांनी मानसिक व शारिरीक कस पाहणारी ही चढाई मुसळधार पावसात सर केली. अखंड चढाईमुळे येणाऱ्या मानसिक थकव्यावर मात करत भैरवगडाला पायाखाली घेतले. या मोहिमेत टीम पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या जाॅकी साळुंखे, चेतन शिंदे, महेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. पुणे, मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यांतील डझनभर गिर्यारोहक मोहिमेत सहभागी झाले होते.

काजलने कळसूबाई शिखरदेखील दोनवेळा केले सर
राज्यातील सर्वाधिक उंच असणारे कळसूबाई शिखरदेखील काजलने दोनवेळा सर केले आहे. अशी ती पहिलीच दिव्यांग तरुणी ठरली आहे. त्याशिवाय दहा जलदुर्गही पायाखाली घातले आहेत. २०१० मध्ये शिकवणी वर्गाला जाताना अपघातात ट्रक पायावरुन गेला, त्यामुळे तिचा एक पाय विकलांग आहे. या कमतरतेवर मात करत गतवर्षीपासून गिर्यारोहणाचे आव्हान पेलायला सुरुवात केली. कुटुंबात आई, वडील, भाऊ असा परिवार असून सांगलीत अभयनगरमध्ये राहते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी गिर्यारोहणाचा सर्व खर्च स्वत:च करते. बीएनंतर सध्या एमपीएससीचा अभ्यास करत आहे. शुभांगी पलुसची रहिवासी असून तिने बीएस्सी शिक्षण पूर्ण केले आहे. कुटुंबात आई, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Shubhangi Patil and Divyang Kajal Kamble climb on Bhairavgad, a very difficult climb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली