कडकनाथ घोटाळ्यातील राष्ट्रवादीमधला शुक्राचार्य शोधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:51+5:302020-12-27T04:20:51+5:30

शिरटे : कडकनाथ घोटाळ्यात गोरगरिबांचे चारशे ते पाचशे कोटी रुपये बुडविणारे आज उजळ माथ्याने फिरत आहेत आणि शेतकऱ्यांची बाजू ...

Shukracharya to be found in NCP in Kadaknath scam | कडकनाथ घोटाळ्यातील राष्ट्रवादीमधला शुक्राचार्य शोधणार

कडकनाथ घोटाळ्यातील राष्ट्रवादीमधला शुक्राचार्य शोधणार

Next

शिरटे : कडकनाथ घोटाळ्यात गोरगरिबांचे चारशे ते पाचशे कोटी रुपये बुडविणारे आज उजळ माथ्याने फिरत आहेत आणि शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस वेठीस धरत आहेत. त्यांना आदेश देणारा काँग्रेस-राष्ट्रवादीतील झारीतील शुक्राचार्य कोण आहे, हे शोधणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. याचवेळी त्यांनी केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना फायद्याचे की तोट्याचे हे न सांगता, मुंबईतील एका वकिलाला तमाशा व चित्रपटाचा आधार घ्यावा लागला, ही शोकांतिका आहे, असे स्पष्ट केले.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आयोजित सभेत ते बोलत होते. संघटनेचे राज्य प्रवक्ते ॲड. एस. यु. संदे, जिल्हाअध्यक्ष महेश खराडे, पोपटअण्णा मोरे, तालुकाअध्यक्ष भागवत जाधव, संदीप राजोबा, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजू शेट्टी म्हणाले, लोकसभेत कायदा करीत असताना कमीत-कमी चार ते पाच महिने लागतात. मग यांनी जूनमध्ये अध्यादेश व ऑगस्टमध्ये कायद्यात रूपांतर कसे केले. घाईगडबडीत केलेले कायदे हे अदानी-अंबानी यांच्या हिताचे असून, शेतकऱ्यांना मात्र ते मारक आहेत.

मी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन वाटचाल करीत आहे. ज्यांनी येथे येऊन हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असे सांगितले, त्यांच्या पायात पत्र्या ठोकण्याचे काम क्रांतिसिंहांनी केले असते, असा टोला राजू शेट्टी यांनी आत्मनिर्भर यात्रेतील नेत्यांना लगावला.

यावेळी आप्पासाहेब पाटील, तानाजी साठे, संतोश शेळके, संजय बेले, धैर्यशील पाटील, मानसिंग पाटील, हणमंत पाटील, मधुकर डिसले उपस्थित होते.

चौकट - १

कारखानदारांचे पुतळे जाळू

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने उसाचे एकरकमी बिल देत आहेत. मग सांगली जिल्ह्यातील का दिला जात नाही. यासाठी आता रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. एक जानेवारीपर्यंत एकरकमी दिली नाही, तर वर्षाची सुरुवात कारखानदारांचे पुतळे जाळून करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला.

फोटो-२६शिरटे१

फोटो ओळ :

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश खराडे, संदीप राजोबा, पोपट मोरे, भागवत जाधव, प्रकाश देसाई उपस्थित होते.

Web Title: Shukracharya to be found in NCP in Kadaknath scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.