निवडणुकीच्या तोंडावर ‘सैराट’ची धूम
By admin | Published: July 29, 2016 11:44 PM2016-07-29T23:44:10+5:302016-07-29T23:52:38+5:30
इस्लामपूर पालिका : शहरात एकीकडे विकास, तर दुसरीकडे भकास परिस्थिती
अशोक पाटील -- इस्लामपूर --स्वत:चे घर, रस्ते, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती या सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु या गरजा पूर्ण करण्यात इस्लामपूर नगरपालिकेला अपयश आले आहे. तरीसुध्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या नाना—नानी पार्कच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. याच्या उद्घाटनासाठी अबाल-वृध्दांसह युवा पिढीचे आकर्षण ठरलेल्या ‘सैराट’फेम आर्ची आणि परशा या जोडीला पाचारण करण्यात आले आहे. एकीकडे विकासाचा फार्स केला जात असला तरी, शहरातील अनेक विकास कामांचा बोऱ्या वाजला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतून संतापाची लाट आहे.
शहरातील नव्याने बांधण्यात आलेले घरकुल, पाणी योजना, महादेवनगरातील कुसूमगंध पार्क, राजारामबापू नाट्यगृह, मोफत वाय—फाय सुविधा, खत प्रकल्प आदी विकास कामांची उद्घाटने दिग्गज सिनेअभिनेत्यांच्याहस्ते केली आहेत. आता अंबाबाई उद्यानाच्या जागी ४ कोटी रुपये खर्च करुन नाना—नानी पार्क उदयास आणले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी ‘सैराट’फेम आर्ची आणि परशाला निमंत्रित केले आहे. परंतु पालिकेने याबाबत गुप्तता पाळली आहे. याची कसलीही जाहिरातबाजी केलेली नाही.
सत्ताधाऱ्यांनी गेल्या ३0 वर्षात विकासकामे केल्याचा गाजावाजा केला आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्चही केले आहेत. परंतु पैशाच्या मानाने विकास कामे झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी वेळोवेळी केला आहे. परंतु त्यांची ताकद तोकडी असल्याने विरोधकांना न जुमानताच सत्ताधाऱ्यांनी आपला हम करेसो कायदा सुरु ठेवला आहे. आतापर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव, घरकुल योजना, नाट्यगृहातील ध्वनी व्यवस्था, तसेच नवीन पाणी योजना असूनही अनेकांना मिळत नसलेले पाणी, कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खराब झाले आहेत, आदी विकास कामांतील त्रुटी समोर आल्या आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी राष्ट्रवादीला विकासाचे वेड लागते. रस्त्यांची डागडुजी, दिवाबत्ती नूतनीकरण, एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी सिनेअभिनेते आणून मते पदरात पाडून घेण्याचा प्रकार केला जातो, हे आता सर्वसामान्यांनाही ज्ञात झाले आहे.