सांगलीतील मार्केट यार्डात शटर डाऊन
By admin | Published: June 15, 2017 10:56 PM2017-06-15T22:56:04+5:302017-06-15T22:56:04+5:30
सांगलीतील मार्केट यार्डात शटर डाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली चेंबर आॅफ कॉमर्सने जीएसटी कराविरोधात गुरुवारी पुकारलेल्या व्यापार बंदला मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदमुळे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. व्यापाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन दिले.
केंद्र सरकारने सर्व कर रद्द करुन एकच जीएसटी कर प्रणाली एक जुलैपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शेतीमालाला कर नव्हता, पण आता जीएसटी कर प्रणालीत कर लावला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून जीएसटी वसूल करुन तो ग्राहकांवर बसवावा लागणार आहे. त्यामुळे शेतीमालाच्या व्यापारावर परिणाम होणार आहे. जीएसटी कर प्रणालीतील त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी सर्व व्यापाऱ्यांनी व्यापार बंद आंदोलन केले होते. सांगली चेंबरचे अध्यक्ष शरद शहा, प्रशांत पाटील, गोपाळ मर्दा, विजय निरवाणे, अण्णासाहेब चौधरी, रमणिक दावडा, राहुल सावर्डेकर आदी व्यापारी प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन दिले.
जीवनावश्यक वस्तू, ब्रॅन्डेड अथवा अनब्रॅन्डेड वस्तू या जीएसटी प्रवर्गातून करमुक्त असाव्यात, मूल्यवर्धित कर प्रणाली, यात करमुक्त असणाऱ्या आटा, रवा, मैदा, मिरची, हळद, सुटा चहा यासारख्या वस्तू जीएसटी कर प्रणालीतून करमुक्त कराव्यात, व्यवसाय कर व कृषी उत्पन्न बाजार समिती सेसची आकारणी रद्द करावी, आदी मागण्या केल्या आहेत.