‘बंद’चा भाजीपाला उत्पादकांना फटका

By admin | Published: July 12, 2016 11:50 PM2016-07-12T23:50:18+5:302016-07-13T00:43:16+5:30

ढबू मिरची, कोबी पावसाने सडला : तुंग, समडोळी, आष्टा, बागणी परिसरातील चित्र

Shutting down the ban on vegetable growers | ‘बंद’चा भाजीपाला उत्पादकांना फटका

‘बंद’चा भाजीपाला उत्पादकांना फटका

Next

सांगली : मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील भाजीपाला व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. परिणामी वाळवा, मिरज, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना दोन दिवसात तीन ते चार कोटींचा फटका बसला आहे. तुंग, समडोळी, आष्टा, बागणी परिसरातील ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर पावसात भिजल्यामुळे सडून गेला आहे.
राज्य शासनाने भाजीपाला आणि शेतीमालावरील निर्बंध उठविले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून अडतही न घेता ती व्यापाऱ्यांनी विकणाऱ्यांकडून वसूल करण्याचा शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी भाजीपाला व अन्य शेतीमाल खरेदी बंद केली आहे. मिरज तालुक्यातील समडोळी, तुंग, कवठेपिरान, कसबेडिग्रज, मल्लेवाडी, खंडेराजुरी, एरंडोली. वाळवा तालुक्यातील आष्टा, बागणी येथून मोठ्याप्रमाणात ढबू मिरची मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील मार्केटला जाते.
तुंग परिसरातून जय हनुमान भाजीपाला पुरवठा व प्रक्रिया संघाच्या माध्यमातून दररोज दहा टनाच्या सहा ट्रकमधून ढबू, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला मुंबई, पुणे येथे पाठविला जातो. रविवारीच मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांनी बंद असल्यामुळे मुंबई, पुणे येथे भाजीपाला आणू नये, अशी सूचना दिली आहे. यामुळे सध्या तयार झालेली ढबू मिरची, कोबी, फ्लॉवर हा शेतीमाल शेतात तसाच पडून आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे भाजीपाला सडण्याची प्रक्रिया चालू असल्याचे संघाचे अध्यक्ष सचिन डांगे यांनी सांगितले.
तुंग परिसराबरोबरच आष्टा, बागणी, दुधगाव, कवठेपिरान येथूनही रोज सहा ट्रक ढबू, कोबी, फ्लॉवर हा शेतीमाल मुंबई व पुणे येथे जात आहे. आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव येथूनही काही शेतकरी ढबू मिरची, टोमॅटो, शेवगा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथील मार्केटला पाठवत आहेत. येथील व्यापाऱ्यांनीही खरेदी बंद केल्यामुळे आणि भाजीपाला मुबलक असल्यामुळे तो विक्री करण्याचे व्यवस्थापन होत नाही. (प्रतिनिधी)

विष्णुअण्णा मार्केटमध्ये लाखोची उलाढाल ठप्प
विष्णुअण्णा फळ मार्केट येथे कांदा, बटाटा, लसूण आदीचे सौदे बंद आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसात येथील लाखो रूपयांची उलाढाल ठप्प झाली असून किरकोळ बाजारातील कांदा, बटाट्याचे दर दोन ते तीन रूपयांनी वाढले आहेत. शिवाजी मंडई येथे मात्र काही शेतकऱ्यांनी स्वत:च भाजीपाला विक्री सुरु केल्यामुळे सांगलीतील ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे. फळांचे व्यवहार पूर्ववत सुरु असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


आष्ट्याचा भाजीपाला हैदराबादला
मुंबई, पुणे शहरात ढबू मिरची, कोबी, फ्लॉवरची मागणी सर्वाधिक असते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे आष्टा येथील पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी हैदराबाद मार्केटला ढबू, कोबी, फ्लॉवरचे तीन ते चार ट्रक पाठविले आहेत. या मालाला तेथे दरही चांगला मिळाला असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांचा असाच बंद सुरू राहिल्यास तुंग, समडोळी, कवठेपिरान येथीलही शेतकरी हैदराबाद, बेळगावला भाजीपाला पाठविण्याच्या तयारीत आहेत.


शासनाकडूनच शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज
शासनाने बाजार समितीच्या बंधनातून भाजीपाला व अन्य शेतीमाल विक्रीसाठी मुक्त केला आहे. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत स्वत:च भाजीपाला विक्री करावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. साहजिकच शेतकऱ्यांच्यादृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण, शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठीची शासनाने यंत्रणा तयार केली पाहिजे. मुंबई, पुणे येथे पन्नास ते साठ शेतकऱ्यांचा रोज दहा ट्रक भाजीपाला फक्त सांगली जिल्ह्यातून जात आहे. हा भाजीपाला मुंबई, पुणे येथे जाऊन विक्री करणे पन्नास शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. भाजीपाला शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवायचा, याविषयीही शासनाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Web Title: Shutting down the ban on vegetable growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.