श्वेता पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित

By Admin | Published: August 30, 2016 11:28 PM2016-08-30T23:28:02+5:302016-08-30T23:59:07+5:30

परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार : आतापर्यंत एक रुपयाही खात्यावर जमा नाही!

Shweta has been absent from the scholarship for five years | श्वेता पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित

श्वेता पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित

googlenewsNext

अविनाश बाड -- आटपाडी --शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्यानंतर परीक्षार्थींवर अभिनंदनाचा वर्षाव होतो. पण राज्याच्या शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होऊनही गेली ५ वर्षे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (पुणे) शिष्यवृत्तीच न दिल्याचा कारभार समोर आला आहे.
येथील श्वेता बाळासाहेब गोडसे या विद्यार्थिनीने इ. ४ मध्ये शिकत असताना २०११ मध्ये पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला भाषा व इंग्रजी विषयात १०० पैकी ९० गुण, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात १०० पैकी ९० गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान या विषयात १०० पैकी ९२ गुण मिळाले. तिला दि. ११ जून २०११ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्या सहीचा निकाल मिळाला. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी श्वेताचे बँकेत खाते काढून सर्व तपशिलासह प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यावर आतापर्यंत एक रुपयाही शिष्यवृत्ती जमा करण्यात आलेली नाही.
शिष्यवृत्तीची बँकेच्या खात्यावर वाट पाहणारी श्वेता २०१४ मध्ये इयत्ता सातवीत गेली. तिने पुन्हा माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा दिली. या परीक्षेत तिला भाषा व इंग्रजी या विषयात १०० पैकी ८४, गणित व सामाजिक शास्त्रे या विषयात १०० पैकी ७६ आणि बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान या विषयात १०० पैकी ८६ गुण मिळाले. ती पुन्हा शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र झाल्याचा निकाल २४ जुलै २०१४ रोजी मिळाला. पुन्हा तिने बँकेच्या खात्याच्या तपशिलासह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) यांना प्रस्ताव दिला. अत्यंत चीड आणणारी गोष्ट म्हणजे या परीक्षेची ही शिष्यवृत्ती अद्याप जमा केलेली नाही.
येथील श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी दि. १४ नोव्हेंबर २०११, दि. ३१ जानेवारी २०१३ आणि २१ जानेवारी २०१६ अशी स्मरणपत्रे पाठविली. सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याची विनंती केली. पण अद्याप पुण्याच्या शिक्षण संचालकांनी यावर कसलीच कारवाई केलेली नाही. आणखी किती वर्षे या विद्यार्थिनीने शिष्यवृत्ती प्रत्यक्षात मिळण्याची वाट पाहायची, हा खरा प्रश्न आहे.

गुणवंतांची उपेक्षा; शिक्षण विभागाचा अजब कारभार!
श्वेताला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण २७२ गुण मिळाले. त्यावेळी २४७ पेक्षा अधिक गुण मिळविलेले सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले, तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत २४६ गुण मिळविले. त्यावेळी २०२ पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. श्वेताचा आटपाडी तालुक्यात पहिला नंबर आला होता. चौथीतील पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना १५०० दरवर्षी इयत्ता १० वीपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. श्वेता सध्या ९ वीत शिकते आहे. या विद्यार्थ्यांसमोर शिक्षण विभागाने लाल फितीचा कारभार मांडला असून, शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांनी कसला आदर्श घ्यायचा.


राज्य परीक्षा परिषदेने अकारण गांधारीची भूमिका घेऊ नये. गुणवंत विद्यार्थ्यांची या विभागाने जी हेटाळणी सुरु केली आहे, ती तात्काळ थांबवली नाही, तर गंभीर परिणाम होतील. बालवयात अभ्यास करून पात्र होऊनही शिष्यवृत्तीच मिळत नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येईल. गुणवत्तापूर्ण विकास होण्यासाठी त्यांना प्रेरणा कशी मिळेल.
- यु. टी. जाधव
अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक

Web Title: Shweta has been absent from the scholarship for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.