शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू
By admin | Published: May 3, 2017 12:06 AM2017-05-03T00:06:47+5:302017-05-03T00:06:47+5:30
शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू
कोकरूड : बांबरवाडी (ता. शिराळा) येथील शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास घडली असून, याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बांबरवाडी येथील गणेश लक्ष्मण कदम (वय ११), अरुण लक्ष्मण कदम (६) व हर्षद हरिबा कदम (८) हे तीन सख्खे चुलत भाऊ बांबरवाडीच्या पश्चिमेला शेततळ्यामध्ये दुपारी दोनच्या सुमारास पोहण्यास गेले होते. या शेततळ्याच्या एका कोपऱ्यात पाणी असल्याने गणेश व अरुण हे दोघे सख्खे भाऊ पाण्यात आंघोळीसाठी उतरले, तर हर्षद हा शेजारीच उभा होता.
यावेळी अरुण हा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी गेलेला गणेशही पाण्यात बुडाला. हे दोघे पाण्यात दिसत नसल्याने हर्षद घाबरून गेला. त्याने घराकडे धाव घेत जवळच असलेल्या गणेशच्या आईला याची माहिती दिली. त्यानंतर गणेशच्या आईसह वाडीतील लोकांनी शेततळ्याकडे धाव घेतली; मात्र गणेश व अरुण दोघेही सापडले नाहीत. मात्र त्यांचे कपडे शेजारीच असल्याने पाण्यात शोध घेतला असता शेततळ्याच्या एका बाजूला असलेल्या पाच ते सहा फूट खड्ड्यात गणेश व अरुण यांचे मृतदेह मिळून आले.
याबाबतची नोंद कोकरूड पोलिसात करण्यात आली असून, तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे करत आहेत. (वार्ताहर)
वडील मुंबईत माथाडी कामगार
गणेश व अरुण हे सख्खे भाऊ असून, गणेश हा गुढे येथील कमला माधव विद्यालयात शिकत असून, त्याने सहावीची परीक्षा दिली आहे, तर अरुण हा जवळच अंगणवाडीमध्ये शिकत आहे. गणेश व अरुण यांचे वडील लक्ष्मण कदम हे मुंबई येथे माथाडी कामगार आहेत, तर आई दोन्ही मुलांसह बांबरवाडी येथे राहते. दोन्ही भावंडांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली होती.