विरोधकांची मोट अहंकाराच्या वाटेवर
By admin | Published: April 12, 2016 10:16 PM2016-04-12T22:16:35+5:302016-04-13T00:11:02+5:30
राजू शेट्टी यांच्यापुढे आव्हान : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीचे वारे
अशोक पाटील -- इस्लामपूर -इस्लामपूर पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले की, विरोधकांना खडबडून जाग येते. त्यानंतर नेतृत्वाची भाषा सुरु होते. नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ऐन निवडणुकीत विरोधी गटातील प्रमुखांचा अहंकार जागा होतो. या अहंकारातूनच द्वेष निर्माण होतो. त्यामुळेच सत्ताधारी राष्ट्रवादी या विरोधकांना नगण्य समजते. आगामी पालिका निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढे आले असले तरी, त्यांना हे आव्हान पेलण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात मातब्बर नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचा समावेश होतो, तर प्रत्यक्षरित्या विरोधी गटातून पालिकेच्या रणांगणात उतरणाऱ्यांमध्ये वैभव पवार, विजय पवार (प्रभाग २), दादा पाटील (प्रभाग ३), आनंदराव पवार (प्रभाग ४), बाबासाहेब सूर्यवंशी, जयकर पाटील (प्रभाग ५), सनी खराडे (प्रभाग ६), जलाल मुल्ला (प्रभाग ७), सतीश महाडिक (प्रभाग ८), विक्रम पाटील (प्रभाग ९), चेतन शिंदे (प्रभाग १0), अमित ओसवाल (प्रभाग ११), कपिल ओसवाल (प्रभाग २१), एल. एन. शहा (प्रभाग २२), विजय कुंभार (प्रभाग २३) हे आघाडीवर असणार आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांचाही भरणा होण्याची शक्यता आहे. विरोधी गटातील उमेदवारी ठरवताना गटप्रमुखांचा अहंकार जागा होत असल्याने, सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे करण्यात विरोधकांना अपयशयच आले आहे.
याबाबत विक्रमभाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या तरी विरोधकांची एकत्र आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा विचार नाही. आगामी पालिकेच्या निवडणूक धोरणाविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जो आदेश येईल त्याप्रमाणे धोरण अवलंबले जाईल. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील १ हजार कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शहरातील १0 ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतरच पालिका निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. याउलट राहुल महाडिक यांची भूमिका वेगळीच आहे. ते म्हणाले, अगोदर विरोधकांनी एकदिलाने एकत्र यावे. निवडणूक जिंकल्यानंतर खुर्चीसाठी भांडावे. परंतु असे कधीही होत नाही. याचाच फायदा सत्ताधाऱ्यांनी उठवला आहे. कपिल ओसवाल, अमित ओसवाल, चेतन शिंदे, सतीश महाडिक, जलाल मुल्ला, उदय पाटील, गाईड कांबळे हे महाडिक गटाच्या आदेशाचे पालन करणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी अद्याप उघडपणे भूमिका मांडलेली नाही. त्यांच्यासह त्यांचे बंधू उमेश पवार, शकील सय्यद व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी देऊन सर्व ठिकाणी उमेदवार देण्याची भाषा त्यांनी सुरु केली आहे.
काँग्र्रेसचे वैभव व विजय पवार हे सख्खे बंधूही निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते विजय कुंभार हे एकाकी लढत देत आहेत. यांना एकत्र आणणे म्हणजे शेट्टी यांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
इस्लामपूर पालिकेत माझा वैयक्तिक स्वार्थ नाही. सर्व विरोधकांना एकत्रित करुन सक्षम आघाडी निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात वारंवार बैठका घेणार आहे. वाळवा तालुक्यात विरोधकांच्यात सक्षम नेतृत्व तयार झाले पाहिजे. त्याला यश आले नाही. परंतु आगामी पालिका निवडणुकीत सर्वांना एकत्रित करुन सत्ता मिळविण्यात आपणास निश्चित यश मिळेल.
- राजू शेट्टी, खासदार.
राष्ट्रवादी विरोधात मातब्बर नेते
राष्ट्रवादीच्या विरोधात मातब्बर नेते आहेत. यामध्ये प्रामुख्याने खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचा समावेश आहे.