शिराळा तालुक्यात बिबट्याचे दर्शन...

By admin | Published: January 15, 2015 10:43 PM2015-01-15T22:43:24+5:302015-01-15T23:19:47+5:30

सतर्कतेच्या सूचना : वाडीभागाई परिसरात वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू

The sight of the leopard in Shirala taluka ... | शिराळा तालुक्यात बिबट्याचे दर्शन...

शिराळा तालुक्यात बिबट्याचे दर्शन...

Next


सतर्कतेच्या सूचना : वाडीभागाई परिसरात वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू
सतर्कतेच्या सूचना : वाडीभागाई परिसरात वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू
पुनवत/सागाव : शिराळा तालुक्यातील वाडीभागाई येथे बुधवारी रात्री नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडल्याने वाडीभागाई, कणदूर, ढोलेवाडी, पुनवत परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. भीतीपोटी डोंगराजवळ शेती असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.
तालुक्यातील वाडीभागाई, कणदूर, ढोलेवाडी, पुनवत, खवरेवाडी या गावांच्या हद्दी लागून असून हा भाग जंगलमय व दुर्गम आहे. दोन महिन्यांपूर्वी पुनवतच्या हद्दीत दोन गवे आढळून आले होते, तर आता वाडीभागाई हद्दीत सरपंच रामचंद्र पाटील व अन्य काही जणांना रात्री वाडीभागाईतून पावलेवाडी खिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले. ग्रामस्थांनी त्याची शोधाशोध करून वन विभागाला पाचारण केले. वन विभागाचे कर्मचारी रात्री बारा वाजेपर्यंत, बिबट्याच्या मागमूस लागतो का हे पाहात होते. मात्र बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले नाही.
पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात घुसलेल्या एका बिबट्याच्या घटनेमुळे तालुक्यातील या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
वनक्षेत्रपाल एस. के. कदम यांनी सांगितले की, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून बिबट्या किंवा कोणताही वन्यजीव नजरेस पडताच, त्याला हुसकावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी अशा घटना ताबडतोब वन विभागाला कळवाव्यात. (वार्ताहर)

वाडीभागाई खिंडीमध्ये काल (बुधवारी) रात्री पावणे दहाच्या सुमारास बिबट्या मोटारीच्या आडवा गेल्याचे मी पाहिले. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली आहे. गुरुवारी गवत कापणी कामासाठी कोणीही डोंगर परिसरात फिरकलेले नाही.
- रामचंद्र पाटील, शेतकरी

दोन महिन्यांपासून दर्शन
कुसाईवाडी, रिळे परिसर, तसेच वाकुर्डे परिसर आणि आता वाडीभागाई येथे बिबट्याचे दर्शन झाले आहे. कुसाईवाडीत बिबट्याने शेळीवर हल्ला केला होता. वेगवेगळ्या भागात दिसणारा हा एकच बिबट्या असावा, असा वन विभागाचा अंदाज आहे.

Web Title: The sight of the leopard in Shirala taluka ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.