सांगलीतील मौजे डिग्रज परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन, व्हिडीओ व्हायरल; वनविभागाकडून पाहणी
By शरद जाधव | Published: July 20, 2023 12:21 PM2023-07-20T12:21:12+5:302023-07-20T12:21:39+5:30
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
सांगली : मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ग्रामस्थांना दर्शन झाले. गेल्या आठवड्यापासून कर्नाळ, बिसूर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा होती. आता या भागातही शेतातील रस्त्यावर प्राणी फिरताना आढळला. अनेकांनी याचे व्हिडीओ व्हायरल केले मात्र, वनविभागाच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या नसून दुसराच प्राणी आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास मौजे डिग्रज ते नांद्रे हा कमी वर्दळीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या तरूणांना या प्राण्याचे दर्शन झाले. त्यांनी याचे चित्रण केले. यात अगदी शांतपणे हा प्राणी रस्ता ओलांडताना दिसतो. शिवाय तो चिखलाने माखलाही आहे. मात्र, बिबट्याच असेल याबाबत ते तरूणही साशंक आहेत. याशिवाय अन्य एका व्हिडीओमध्ये पाणी पिण्यासाठी हौदाजवळही हाच प्राणी आढळून आला.
गेल्याच आठवड्यात कर्नाळजवळ शेतकऱ्यांवर एका प्राण्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता नंतर दोनच दिवसात जवळच असलेल्या बिसूर गावातच प्राण्याचे दर्शन झाले होते. बिसूरमध्ये एका दुकानाबाहेरील सीसीटिव्हीमध्येही त्या प्राण्याच्या हालचाली दिसून येतात. यानंतर आता त्याच भागात मौजे डिग्रज परिसरात प्राण्याचे दर्शन झाले आहे. हा बिबट्याच की अन्य कोणता याबाबत वनविभागाकडून तपास केला जात आहे.