सांगली जिल्हा परिषदेत राजकीय भूकंपाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:56 PM2018-10-02T23:56:01+5:302018-10-02T23:56:05+5:30
सांगली : भाजपच्या जिल्हा परिषदेतील बारा सदस्यांनी पदाधिकारी बदलासाठी बंड करून नेत्यांमधील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दाखवून दिले आहे. बंडाची दखल न घेतल्यास राजकीय भूकंप करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला असून, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो भाजप नेतृत्वाला कचाट्यात पकडणार आहे. सदस्यांच्या आडून भाजपचे नेते कोणता राजकीय भूकंप घडविणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेत भाजपला काठावरचे बहुमत असून, पुरस्कृत सदस्यांसह त्यांची संख्या २५ आहे. मित्रपक्ष शिवसेनेचे तीन, रयत विकास आघाडीचे चार, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनोचा एक असे ३५ सदस्यांचे संख्याबळ भाजपकडे आहे. विरोधकांकडे राष्ट्रवादीचे १४, काँग्रेसचे १० आणि अपक्ष एक असे २५ सदस्यांचे बळ आहे. अध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची संख्या जास्त होती. यातून तोडगा काढण्यासाठी सव्वा-सव्वा वर्षासाठी सर्व इच्छुकांना संधी देण्याचे निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला होता. मात्र सव्वा वर्षानंतरही अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह चार सभापतींनी राजीनामे दिले नसल्यामुळे भाजपच्या नेत्यांमधील कलह उफाळून आला आहे.
शिवाजी डोंगरे, सुरेंद्र वाळवेकर, खासदार संजयकाका पाटील यांचे चुलते डी. के. पाटील हे अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. उपाध्यक्ष, सभापतीपदाची संधी आपणास मिळावी, अशी जत, आटपाडी, मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ तालुक्यातील सदस्यांची अपेक्षा आहे. पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट करून नव्या चेहºयांना संधी द्यावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. खासदार पाटील, आ. विलासराव जगताप यांनीही पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रही मागणी केली आहे. मागील आठवड्यात सदस्यांसह नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. कोअर कमिटीत बदलाबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सदस्यांना केली होती. मात्र कोअर कमिटीची दि. २८ सप्टेंबररोजी इस्लामपूर येथे होणारी बैठक झाली नसल्यामुळे भाजप नेते आणि सदस्यांमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. पदाधिकारी बदलासाठी नेत्यांना साकडे घालूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सदस्यांनी अखेर सोमवारी बंडाचे हत्यार उपसले. या बंडानंतर भाजप नेत्यांमध्ये खळबळ उडाली. बंड करूनही पदाधिकारी बदल झालाच नाही, तर राजकीय भूकंप होईल, असा इशारा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सदस्यांनी दिला आहे.
सदस्यांच्या माध्यमातून काही भाजप नेत्यांनीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये राजकीय भूकंप होतात. तशाप्रकारे भाजपमधील नाराज गट अन्य पक्षाच्या हाताला तरी लागला नाही ना, याचा अंदाज सध्या भाजपचे नेतृत्व घेत आहे.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करीत या प्रश्नाला बगल दिली आहे. त्यामुळेच भाजपचे सदस्य नाराज आहेत. भाजप शिस्तबद्ध पक्ष समजला जातो. परंतु तेथे सदस्यांच्या म्हणण्याला महत्त्वच नसल्याने, पक्षालाच त्यांनी थेट आव्हान दिले आहे. सदस्यांनी भाजपच्या शिस्तीची लक्तरे वेशीवर मांडली. संजयकाका पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तो या बंडाळीमुळे पुन्हा उफाळून आल्याचे दिसत आहे.
शिवसेनेचे तीन सदस्य असल्यामुळे आ. अनिल बाबर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संजयकाका आणि गोपीचंद पडळकर यांच्यातही मतभेद आहेत. पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद सभापती असून, या बदलात त्यांचे पद गेले तर ते काय करणार, असा प्रश्नही आहे. रयत विकास आघाडीच्या चार जागांमध्ये महाडिक गटाचे दोन सदस्य आहेत. जगन्नाथ माळी (पेठ) आणि निजाम मुलाणी (येलूर) या दोघांपैकी एकाला सभापतीपद मिळेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्या सध्या भाजपपासून दूर आहेत. खा. राजू शेट्टी यांनी भाजपविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे भाजप आघाडीकडे सध्या ३४ संख्याबळ आहे. पदाधिकारी बदलताना शिवसेना, रयत विकास आघाडीकडे पद कायम ठेवावे लागणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गटालाही सभापतीपद द्यावे लागेल. अन्यथा भाजपचे सत्तेचे गणितच बिघडणार आहे. त्याची प्रचिती जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत आली आहे. जर पदाधिकारी बदलायचे झाले, तर भाजपमधील देशमुख गट, पडळकर गट, तसेच सेनेच्या बाबर गटाच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
अध्यक्ष, सभापतिपदाचे : दावेदार
अध्यक्ष पदासाठी शिवाजी डोंगरे, सुरेंद्र वाळवेकर, डी. के. पाटील इच्छुक आहेत. सभापतिपदासाठी जतमधून सरदार पाटील, स्नेहलता जाधव, सुनीता पवार, मिरज तालुक्यातून मनोज मुंदगनूर, प्राजक्ता कोरे, सविता कोरबू, कवठेमहांकाळ तालुक्यातून घोरपडे गटाच्या संगीता नलवडे, आशा पाटील, वाळव्यातील रयत आघाडीचे जगन्नाथ माळी, तर तासगावमधील प्रमोद शेंडगे यांनी दावेदारी केली आहे.