सांगलीत कृष्णा नदी स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:03 PM2019-02-08T14:03:35+5:302019-02-08T14:03:51+5:30
सांगली शहराची जीवनदायीनी असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहीम राबविली. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्पही करण्यात आला. निर्माल्य नदीत टाकणाऱ्यांविरोधात गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीमही हाती घेतली जाणार आहे.
सांगली : शहराची जीवनदायीनी असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहीम राबविली. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्तीचा संकल्पही करण्यात आला. निर्माल्य नदीत टाकणाऱ्यांविरोधात गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीमही हाती घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या स्थापनेला २१ वर्षे पूर्ण झाली. वर्धापन दिनानिमित्ताने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कृष्णा प्रदूषणमुक्तीचा संकल्प केला होता. शुक्रवारी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अजिंक्य पाटील, प्रभाग एकच्या सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, सुब्राव मद्रासी, संजय कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारीही कृष्णा नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
महिला नगरसेविकांनीही नदीपात्रात उतरून स्वच्छता केली. सुमारे एक टन कचरा, प्लास्टिक व निर्माल्य नदीपात्रातून काढण्यात आले. कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा प्रकल्प महापालिकेच्यावतीने हाती घेतला जाणार असल्याचे भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार यांनी सांगितले. त्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल, असे स्पष्ट केले. महापौर संगीता खोत यांनी महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करणार असून, पुढील अडीच वर्षात कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीसाठी सर्व नगरसेवक शनिवारपासून कृष्णा नदीच्या पुलावर निर्माल्य नदीत टाकणऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने फुले देऊन प्रबोधनाची मोहीम हाती घेणार आहेत. तसेच नदीपात्रात निर्माल्य न टाकण्याबाबतही जनतेत जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपायुक्त मौसमी चौगुले-बर्डे, सहा आयुक्त दिलीप घोरपडे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जनसंपर्क अधिकारी डी. व्ही. हर्षद, आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, डॉ. सुरवशी, अग्निशमन अधिकारी देसाई, चिंतामणी कांबळे यांच्यासह विविध विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.