महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:37 PM2019-09-23T19:37:30+5:302019-09-23T19:38:52+5:30
दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो.
अविनाश कोळी ।
सांगली : गेल्या पाच वर्षात भाजप, शिवसेनेत झालेली मोठी भरती, घटकपक्षांकडून जागेसाठी होत असलेला आग्रह आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी यामुळे उमेदवारी वाटपावेळी महायुतीत नाराजीनाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. गत विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढूनही प्रत्येक पक्षाने बंडखोरीचा अनुभव घेतला होता. आता आघाडी, महायुतीमुळे नाराजीचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागू शकतो.
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील लढती लक्षवेधी होणार आहेत. बहुतांश मतदारसंघात तिरंगी व काही ठिकाणी नाराजीतून चौरंगी, पंचरंगी निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व मोठ्या पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी, मनसे व अपक्षांच्या गर्दीत बहुरंगी लढती झाल्या होत्या. यंदा तशी परिस्थिती नाही. आघाडी आणि महायुतीचा सामना रंगत असताना, काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.
मात्र महायुतीला सर्वाधिक नाराजीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आठपैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले आहेत. या जागांमध्ये आणखी काही जागांची भर घालण्याची भाजप नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आणखी एखादी जागा पदरात पडावी, म्हणून त्यांच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे शिवसेना आक्रमकपणे भाजपच्या काही जागांवर दावेदारी करू लागली आहे. जिल्ह्यातील पाच जागांसाठी त्यांचा दावा असून किमान चार विधानसभा मतदारसंघात तरी शिवसेनेला तिकीट मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी बाळगली आहे.
शिवसेनेशिवाय राष्टÑीय समाज पक्ष व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या दोन पक्षांनीही महायुतीकडे जिल्ह्यातील जागांसाठी दावा केला आहे. दोन्ही पक्षांना किमान एका तरी जागेची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षाांना दोन जागा दिल्यास भाजपच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या इच्छेला दणका बसणार आहे. त्यामुळे या दोन्ही घटकपक्षांबाबत तूर्त विचार केला गेला नाही. दोन्ही पक्षांचे, नेत्यांचे सांगलीशी जवळचे संबंध असल्यामुळे जिल्ह्यातील एखादी जागा मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत. शिवसेना, भाजपमध्येच जिल्ह्यातील जागावाटप झाले, तर घटकपक्षांच्या नाराजीचा सामना युतीला करावा लागू शकतो.