जिल्ह्यात १७ फेब्रुवारीस अवकाळी पावसाची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:20+5:302021-02-14T04:24:20+5:30
सांगली : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रवात तयार झाला असून, केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य ...
सांगली : उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागात चक्रवात तयार झाला असून, केरळ किनारपट्टीलगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रावरील चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात १७ फेब्रुवारीस अवकाळी पावसाची चिन्हे आहेत.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची चिन्हे आहेत. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार १६ फेब्रुवारीस अंशत: ढगाळ वातावरण, १७ रोजी अवकाळी पाऊस, १८ फेब्रुवारीस ढगांची दाटी असे वातावरण राहणार आहे. या काळात तापमानातही चढ-उतार राहण्याची चिन्हे आहेत. १९ फेब्रुवारीपासून आकाश पुन्हा निरभ्र होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील काही भागात १७ फेब्रुवारीस तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे असून, काही ठिकाणी केवळ विजांचा कडकडाट होईल. तापमानात सध्या बदल होत आहेत. जिल्ह्यात शनिवारी किमान तापमान १७, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. १७ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान १९ अंशांपर्यंत वाढणार असून, कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत वाढणार आहे. हवामान होत असलेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडी, दिवसभर सामान्य तापमान असे वातावरण होते. आता पावसामुळे हवामानाच्या लहरीपणाचा फटकाही नागरिकांना बसणार आहे.
चौकट
कोल्हापूर, सातारा, सोलापुरातही चिन्हे
सांगलीसह कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही १७ फेब्रुवारीस पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. या काळात या चारही जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार राहणार आहे.