सिकंदर शेखने अली इराणीला बॅक थ्रो डावावर केले चीतपट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:11 PM2024-01-31T12:11:09+5:302024-01-31T12:12:33+5:30
समडोळी : सांगली येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने बॅक थ्रो डावावर जागतिक विजेता ...
समडोळी : सांगली येथे प्रजासत्ताक दिनी झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने बॅक थ्रो डावावर जागतिक विजेता अली इराणीला हरवले आणि रोख दीड लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मैदान आयोजित करण्यात आले. शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांकाच्या लढतीत सिकंदरचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते. वेगवान व आक्रमक खेळणाऱ्या सिकंदरपुढे अली इराणीचा निभाव लागला नाही. पहिल्या पाच ते सहा मिनिटांत सिकंदरने बॅक थ्रो डाव घेत इराणीला आसमान दाखवले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सुबोध पाटील, सांगली याने प्रतिस्पर्ध्याला अवघ्या चार मिनिटांत घिस्सा डावावर पराभूत केले. तिसऱ्या क्रमांकासाठी सुदेश ठाकूर व कमलजीत यांच्यात लढत झाली. ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पृथ्वीराज पवार माने याने बाबा रानगे यास चीतपट केले.
अन्य छोट्या प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये ओंकार खेत्रे, श्रीजीत पवार यांनी कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजप नेते मोहन वानखंडे, पोलिस निरीक्षक संजय मोरे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उद्योजक अभिजित कोळी, संभाजी सावर्डेकर, पहिलवान विजय खेत्रे, सुजित हांडे - पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.