इस्लामपुुरात अकरानंतर रस्त्यावर सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:44+5:302021-04-26T04:23:44+5:30
अकरानंतर संचारबंदी आणि तापमानात वाढ झाल्याने शहरातील रस्ते ओस पडले आहेत. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शासनाने अत्यावश्यक सेवा ...
अकरानंतर संचारबंदी आणि तापमानात वाढ झाल्याने शहरातील रस्ते ओस पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता १५ एप्रिलपासून पूर्णत: संचारबंदी जाहीर केली. सकाळी ७ ते ११ या दरम्यान फळे, भाजीपाला, दूध आणि किराणा दुकाने यांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळच्या दोन तासात रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसत आहे. यातच आता शहरातील तापमान ३८ अंशांपेक्षा जास्त असल्याने मुख्य रस्ते ओस पडू लागले आहेत.
कोरोनाचा कहर वाढत असल्याने पूर्णत: संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यातच आता वीकेंडचा रविवार असल्याने प्रशासकीय आणि बॅँकिंग सेवाही बंद आहेत. सकाळच्या सत्रात भाजीपाला आणि किराणा खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतात. याठिकाणी नेहमीच सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसते. अकरानंतर किमान अर्धा तास रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना उठवताना पालिका प्रशासन आणि पोलिसांची दमछाक होते. हे विक्रेते स्वत:हून संचारबंदीचे पालन करत नाहीत. यावर पालिका प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
सध्या तापमान वाढले असून, शहरातील तापमानही ३८च्या दरम्यान असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. महसूल कार्यालय बंद असल्याने तहसीलदार कार्यालयासमोरील चौकामध्येही शुकशुकाट आहे. गांधी चौक, बसस्थानक रोड आणि मुख्य रस्त्यावरील व्यापारी पेठा बंद असल्याने या रस्त्यावरील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. तरीही काही दुचाकीस्वार विनाकारण रस्त्यावरून फिरत असल्याचे दिसतात. अतितापमानापुळे पोलिसांचा फौजफाटाही विश्रांतीच्या छायेत आहे. एकंदरीत असेच वातावरण काही दिवस राहिले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हरवण्यास वेळ लागणार नाही.
कोट
तापमान जादा असले तरी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पहिला आणि दुसरा डोस देण्याचे काम उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही दुपारपर्यंत दीडशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आजअखेर ९ हजारांच्या वर लसीकरण झाले आहे.
- डॉ. नरसिंग देशमुख, अधिष्ठाता, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर