मानधनावरील वाहनचालकांना महापालिकेकडून सीमकार्ड
By admin | Published: January 6, 2015 11:29 PM2015-01-06T23:29:24+5:302015-01-07T00:06:23+5:30
धक्कादायक माहिती : प्रशासनाकडून पुरविले जातात चोचले
सांगली : महापालिकेत वेगवेगळ््या विभागांकडे काम करणाऱ्या चार वाहनचालकांना महापालिकेने स्वखर्चातून सीमकार्ड दिले असून, महिन्यापोटी प्रत्येकी ३०० रुपये बिलापोटी त्यांना मंजूर करण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या पत्राला उत्तर देताना ही माहिती उजेडात आली. कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्याला, मानधनावरील कर्मचाऱ्याला महापालिका खर्चातून सीमकार्ड व त्याच्या महिन्यापोटीच्या बिलाची तजवीज करावी, असे कोणतेही शासन परिपत्रक नाही. नियमातही तसा कोठे उल्लेख नाही. तरीही महापालिकेतील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी महापालिका मोबाईलच्या खर्चाचे चोचले पुरवित आहे. यात भर म्हणून की काय चार मानधनावरील वाहनचालकांनाही त्यांनी सीमकार्ड व प्रतिमाह ३०० रुपयांपर्यंतच्या बिलाला मंजुरी दिली आहे. वाहनचालकांमध्ये एलबीटी विभागाकडील अमोल गोंधळे, सभागृह नेत्यांकडील सुनील यादव, सांगली उपायुक्तांकडील स्वप्नील पाटील, मिरज उपायुक्तांकडील आर. जी. मकानदार यांचा समावेश आहे. वाहनचालकांना सीमकार्ड देऊन प्रतिमाह त्याच्या ३०० रुपयांच्या बिलाची जबाबदारी सोसण्याची इतकी निकड का भासली, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीआय कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी ही माहिती मागविली. त्यामुळे महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या सीमकार्डच्या खर्चाचा विषय आता गाजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)