तुंगमध्ये साधेपणाने हनुमान जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:33+5:302021-04-28T04:28:33+5:30
कसबे डिग्रज : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मिरज तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या तुंग येथील ...
कसबे डिग्रज : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मिरज तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या तुंग येथील हनुमान मंदिरात गतवर्षीप्रमाणे यावेळीही कोरोनाच्या सावटामुळे भाविकांविना हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
मंगळवारी सकाळी सूर्योदयाबरोबर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जन्मकाळ साजरा करण्यात आला. जन्मकाळ, पूजा, धार्मिक विधी, पाळणा गायन असा कार्यक्रम झाला. यावेळी पुजारी, मानकरी व मंदिर समितीचे मोजके सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, दिवसभर मंदिर परिसरात बॅरिकेड लावून मंदिर परिसरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक दिवसभर तैनात होते. मंदिराला विद्युत रोषणाई केली होती, त्याचप्रमाणे मूर्ती व मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. कोरोनामुळे महाप्रसाद रद्द करण्यात आला होता.
चौकट
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हनुमान जन्मकाळ मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पूजा धार्मिक विधी, जन्मकाळ पाळणा गायन असे कार्यक्रम झाले.
फोटो : २७ कसबे डिग्रज १
ओळ : तुंग (ता. मिरज) येथील हनुमान मंदिरात प्रवेशद्वारातूनच भाविकांनी दर्शन घेतले.