पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजांना एकाचवेळी मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:24+5:302021-01-08T05:25:24+5:30
सांगली : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमीच बंदोबस्तासाठी सज्ज रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या रजा ...
सांगली : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमीच बंदोबस्तासाठी सज्ज रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या रजा मिळत नाहीत. नेमकी हीच अडचण ओळखून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी एकाचवेळी २५०० कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजांना मंजुरी दिली आहे. अधीक्षकांच्या या उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना सुखद भेट मिळाली आहे.
पोलीस अंमलदारांना वर्षातून ३० दिवसांची पूर्ण पगारी रजा देय असते. मात्र, त्यास अडचणी येतात. त्यात यापूर्वीच्या पोलीस दलाच्या कार्यालयीन पध्दतीनुसार कमचाऱ्यांनी ज्यावेळी रजेची आवश्यकता असे, त्यावेळी ते रजेचा अर्ज कायार्लयात सादर करत होते. त्यानंतर अर्जावर विचार होऊन रजा मंजूर मिळत असल्याने या प्रक्रियेस विलंब लागत असे.
हाच अनावश्यक विलंब टाळण्यासाठी अधीक्षक गेडाम यांनी २५०० कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी रजांना मंजुरी दिली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना क्रमाक्रमाने या रजेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा मिळण्यास कोणतीही अडचणी येणार नाही, असा विश्वास अधीक्षक गेडाम यांनी व्यक्त केला.