पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग: यातना प्रवाशांच्या पदरी टाकत सहापदरीचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:31 PM2024-06-18T12:31:27+5:302024-06-18T12:31:51+5:30

कासेगाव ते कणेगाव मार्गावर गोंधळ : सिमेंटचे दुभाजक, धोकादायक वळणांमुळे अपघात वाढले

Since the six-lane construction of the Pune-Bangalore National Highway began, the 31-kilometer journey from Kasegaon to Kanegaon in Sangli district has been a torturous journey for passengers | पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग: यातना प्रवाशांच्या पदरी टाकत सहापदरीचे काम

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग: यातना प्रवाशांच्या पदरी टाकत सहापदरीचे काम

मानाजी धुमाळ

रेठरे धरण : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कणेगाव या ३१ किलोमीटर अंतरात प्रवाशांचा यातनादायी प्रवास सुरू आहे. सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आलेेली वाहतूक, पांढरे पट्टे नसलेले गतिरोधक, मध्येच उभारलेले सिमेंटचे दुभाजक, टप्प्याटप्प्यावर पावसाच्या पाण्याने व्यापलेले रस्ते यामुळे महामार्ग आता महाकसरतीचा मार्ग होऊन बसला आहे.

सांगली जिल्ह्याच्या हद्दीत कासेगाव येथे पुलाचे रुंदीकरण तर, येवलेवाडी फाटा, काळमवाडी फाटा, नेर्ले, वाघवाडी फाटा, येलूर येथे उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावरून सर्व वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. न दिसणारे गतिरोधक, धोकादायक वळणमार्ग यामुळे गेल्या काही महिन्यांत येथील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूककोंडीचा प्रश्नही सतावत आहे. स्थानिक नागरिकांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनाही अनेक प्रकारचा त्रास सोसावा लागत आहे.

कोणाकडे कोणते काम

पेठनाका ते कासेगाव हे काम डी. पी. जैन कंपनीकडे आहे. पेठ नाका ते कणेगाव येथील वारणा पुलाचे काम रोडवेज कंपनी पाहत आहे. पेठ ते कणेगावपर्यंत रस्त्याच्या कामाचा वेग अत्यंत मंद आहे.

कुठे काय दिसले?

  • पेठ ते कणेगाव येथील सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे.
  • कासेगाव ते कणेगाव दरम्यान ठिकठिकाणी वळणमार्ग केले आहेत. या ठिकाणी सूचनाफलक नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.
  • नेर्ले ते कासेगावपर्यंत ठिकठिकाणी पांढरे पट्टे नसलेले गतिरोधक उभारले गेले आहेत. त्यामुळेही अपघात होताहेत.
  • कासेगाव ते कणेगाव या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला घासून सिमेंटचे दुभाजक उभारले आहेत. त्याला धडकूनही अपघात झाले आहेत.
  • नेर्ले, काळमवाडी फाटा ते येवलेवाडी फाटा या पाच किलोमीटर अंतरामध्ये तीन उड्डाणपुलांचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडी होत आहे.


पावसाळ्यात वाढणार अडचणी

सहापदरीकरणाच्या कामामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे कसरत करीत वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे. मोठ्या पावसात मार्ग बंद झाल्यास पर्यायी रस्त्यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कासेगाव ते कणेगावदरम्यान बऱ्याच ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असले तरी रात्री विद्युत व्यवस्थेअभावी वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे.

वर्षभरात झालेले गंभीर अपघात

पोलिस ठाणे - अपघात - मृत - जखमी
कासेगाव - ४ - १ - ३
कुरळप - ८ - ७  - १०


कासेगावच्या पोलिस निरीक्षकांनी केलेल्या सूचनेनुसार केदारवाडी येथील अपघातास कारणीभूत ठरत असलेले एक गतिरोधक काढले आहे. पेठ ते कासेगावपर्यंत गतिरोधकवर रविवारी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. सिमेंटचे दुभाजकही क्रेनच्या साह्याने व्यवस्थित केले आहेत. - विकास पाटील, कंत्राटदार यांच्याकडील अभियंते

Web Title: Since the six-lane construction of the Pune-Bangalore National Highway began, the 31-kilometer journey from Kasegaon to Kanegaon in Sangli district has been a torturous journey for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.