सिंधुदुर्ग : पेंडूर ग्रामपंचायत कथित चवळी घोटाळा प्रकरणी अपात्र सदस्यांना क्लिनचिट, कोकणच्या अप्पर आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:00 PM2018-01-24T18:00:47+5:302018-01-24T18:09:06+5:30
मालवण तालुक्यातील पेंडूर-खरारे ग्रामपंचायतीत चवळी घोटाळा केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी ३० मे २०१७ साली सरपंचासह चार सदस्यांना बडतर्फ केले होते. याबाबत ग्रामपंचायत सदस्य संजय सुभाष नाईक, साबाजी बाबू सावंत व रवींद्र जगन्नाथ गावडे यांनी कोकण विभागाचे अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील केले असता तीनही सदस्यांना क्लीनचीट देण्यात आली.
मालवण : तालुक्यातील पेंडूर-खरारे ग्रामपंचायतीत चवळी घोटाळा केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी ३० मे २०१७ साली सरपंचासह चार सदस्यांना बडतर्फ केले होते. याबाबत ग्रामपंचायत सदस्य संजय सुभाष नाईक, साबाजी बाबू सावंत व रवींद्र जगन्नाथ गावडे यांनी कोकण विभागाचे अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील केले असता तीनही सदस्यांना क्लीनचीट देण्यात आली.
रवींद्र जगन्नाथ गावडे
अप्पर जिल्हाधिकारी यांनी कलम १४ (ग) मधील तरतूद दोननुसार स्पष्टीकरणाचा चुकीचा अर्थ पारित करून अपिलार्थींना अपात्र ठरवले. कथित चवळी खरेदीत अपिलार्थीचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. बियाणे खरेदी केलेल्या व्यक्ती सदस्यांचे नातेवाईक असून त्यांनी शेतकरी या नात्याने चवळी बियाणे खरेदी केली. त्यामुळे अप्पर आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी अपिलार्थी तीनही व्यक्तींच्या बाजूने निकाल देत सदस्यपदी कायम करण्यात येत असल्याचे आदेश दिले.
साबाजी बाबू सावंत
मालवण तालुक्यातील पेंडूर खरारे ग्रामपंचायत गेले काही महिने अनेकविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तत्कालीन सरपंच भावना भालचंद्र प्रभू यांच्यासह संजय सुभाष नाईक, साबाजी बाबू सावंत, रवींद्र जगन्नाथ गावडे, सत्वशीला संजय पाटकर या ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या चवळी बियाणेची खरेदी चांगलीच भोवली.
याबाबत तक्रारदार संजय विश्वनाथ सावंत यांनी आॅक्टोबर २०१६ साली गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे लक्ष वेधून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पेंडूर-खरारे ग्रामपंचायतीच्यावतीने शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी खरेदी करण्यात आलेली सुमारे ४०० किलो चवळी वाटपात घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्यानंतर तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी ३० मे २०१७ रोजी सरपंचासह चारही सदस्यांना अपात्र ठरविले होते. याप्रकरणी तीन सदस्यांनी कोकण विभागाचे अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयात दाद मागितली.
अप्पर जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांविरोधात एकत्र कार्यपद्धतीचा अवलंब करत सामायिक आदेश पारित केले. जिल्हाधिकारी यांना कलम १६ अन्वये दावा निकालात काढण्याचे आदेश असताना गटविकास अधिकारी यांनी दिलेला अहवाल विचारात घेऊन स्पष्टीकरणाचा चुकीचा अर्थ लावून आदेश पारित केला.
कथित चवळी बियाणे खरेदी ग्रामपंचायत सदस्यांनी केली नव्हती, असे असताना अप्पर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेचे कोणतेही कारण स्पष्ट न करता गटविकास अधिकारी यांच्या अहवालावर अवलंबून राहून सदस्य अपात्रतेचा आदेश दिला.
याप्रकरणी कलम १४ नुसार परिस्थिती विचारात घेऊन अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश रद्द करण्यात यावेत, असा युक्तीवाद अप्पर आयुक्तांंकडे सुनावणीवेळी मांडला. अपिलार्थीच्या बाजूने उच्च न्यायालयाचे वकील सुधीर प्रभू यांनी काम पाहिले.
संजय नाईक यांचा दुसरा विजय
सदस्य अपात्रतेची टांगती तलवार कायम असताना जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबर रोजी सरपंच पदाच्या लावलेल्या निवडणुकीत संजय नाईक हे बिनविरोध निवडून आले. मात्र, या निवड प्रक्रियेला ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पेंडूरकर यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली.
याप्रकरणी निवडणूक रद्दचे आदेश दिले. त्यामुळे नाईक यांनी कोकण अप्पर आयुक्त हिरालाल सोनावणे यांच्याकडे २ जानेवारी रोजी दाद मागितली असता सरपंच निवडणुकी रद्दच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर चवळी घोटाळाप्रश्नी नाईक यांच्यासह दोन सदस्यांनी पुन्हा एकदा अप्पर आयुक्तांच्या न्यायालयात दाद मागितली असता त्यांना याप्रकरणातही क्लीनचीट देण्यात येऊन दिलासादायक निर्णय देण्यात आला. त्यामुळे संजय नाईक हे न्यायनिवाड्यात दुसºयांदा विजयी झाले.
पाचही ग्रामपंचायत सदस्यांना नाहक त्रास : संजय नाईक
पेंडूर गावाच्या कथित चवळी घोटाळाप्रकरणी पाचही ग्रामपंचायत सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
चवळी बियाणे खरेदीत आमचा प्रत्यक्ष सहभाग नसतानाही विरोधकांनी घाणेरडे राजकारण करून या प्रकरणात आम्हाला गोवले. त्यामुळे नाहक बदनामी झाली.
अनुदान रकमेच्या ९० रुपये किंमतीच्या दराने दोन किलोचे चवळी बियाणे खरेदीचा विषय होता.
आम्ही चवळी खरेदी केली नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने आम्ही संयम ठेवून अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली. त्याचा फायदा झाला, अशी प्रतिक्रिया सरपंच संजय नाईक यांनी दिली.
आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत
कथित चवळी घोटाळाप्रकरणी पेंडूर ग्रामपंचायतीची मासिक सभा २७ आॅक्टोबर २०१५ रोजी झाली होती. यात उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चवळी बियाणे वाटप करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
चवळी बियाणे वाटपात ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष चवळी बियाणे खरेदी केले नाही. त्यांच्या नातेवाईकांनी शेतकरी या नात्याने बियाणे खरेदी केले आहे.
याप्रकरणी सदस्यांचा कोणताही थेट हक्क अथवा हितसंबंध नसल्याचे दिसून येत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १४.१ (ग) नुसार पेंडूर खरारे ग्रामपंचायतीचे सदस्य अपात्र ठरविण्याची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची कृती योग्य नाही.
ताशेरे ओढताना अप्पर आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी अपिलार्थी यांनी केलेले अपील मान्य करत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी ३० मे २०१७ रोजी दिलेला सदस्य अपात्रतेचा आदेश रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संजय नाईक, साबाजी सावंत व रवींद्र गावडे यांचे सदस्य पद कायम करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा मिळाला आहे. त्या आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.