‘थ्री फेज’ कनेक्शनला सिंगल फेज मीटर
By Admin | Published: July 9, 2015 11:39 PM2015-07-09T23:39:54+5:302015-07-09T23:39:54+5:30
सावळज उपविभागात सहाशेपेक्षा जास्त मीटर : शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
दत्ता पाटील- तासगाव -थ्री फेज वीज कनेक्शन असेल तर, सर्रास थ्री फेजची मीटर बसवायला हवीत, हा नियम आहे. मात्र महावितरण कंपनीकडून चक्क थ्री फेजच्या शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी सिंंगल फेजची घरगुती वापराची मीटर बसविण्यात आलेली आहे. तासगाव तालुक्यातील एका सावळज उपविभागातच अशा प्रकारची सहाशेहून अधिक मीटर बसविण्यात आलेली असून, त्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत केलेल्या तक्रारीकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
महावितरणकडून शेतीपंपासाठी मीटर सक्तीचे करण्यात आले. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी मीटर बसवून घेतले. मात्र दोन ते तीन वर्षांपासून जुने मीटर खराब झालेल्या, तसेच नव्याने मीटर बसविण्यात येणाऱ्या ग्राहकांच्या शेतीपंपावर थ्री फेज कनेक्शन असून देखील सिंगल फेजचे घरगुती वापराचे मीटर बसविण्यात आलेले आहे. काही शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. सिंंगल फेज मीटर कंपनीकडून आलेले आहे. ते नियमानुसार आहे. तुमची तक्रार असल्यास अर्ज करा, मीटर तपासणीसाठीची फी भरा, त्यानंतर मीटर बदलण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
महावितरणकडे थ्री फेजची मीटर शिल्लक नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळ मारुन नेण्यासाठी सिंंगल फेजची मीटर बसवली. महावितरणकडे मागणीनुसार मीटरचा पुरवठा होत नसल्यामुळेच अशी चुकीच्या मीटरची जोडणी केली आहे. तासगाव तालुक्यात तीन उपविभाग आहेत. यापैकी एका सावळज उपविभागातच सहाशेपेक्षा जास्त मीटर सिंंगल फेजची बसविण्यात आलेली आहेत. अन्य दोन उपविभागातही असाच प्रकार झाला आहे. नियमबाह्य सिंंगल फेज मीटर काढून, थ्री फेजची मीटर तात्काळ बसवून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
मी शेतीसाठी थ्री फेजचे वीज कनेक्शन घेतले आहे. मीटरमध्ये बिघाड झाल्यानंतर मी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर माझे मीटर बदलण्यात आले. परंतु त्यावेळी थ्री फेजच्याऐवजी सिंंगल फेज मीटर बसविण्यात आले. तेव्हापासून माझ्या वीज बिलात सरासरीपेक्षा वाढ होत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
- चंद्रकांत पाटील,
बस्तवडे (ता. तासगाव)
शेतकऱ्यांना भुर्दंड
सिंंगल फेज मीटर बसविल्यानंतर वीज बिल जास्त येत असल्यास किंवा बिघाड झाल्याची तक्रार केल्यास, शेतकऱ्यांना जुने मीटर घेऊन येण्यास सांगितले जाते. त्याच्या तपासणीसाठी ३०० ते ४०० रुपयांचा भुर्दंडदेखील सोसावा लागतो. विनाकारण महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दहा वर्षे झाली, तेव्हापासून महावितरण कंपनीच्या माध्यमातून वीज मंडळाचा कारभार सुरु आहे. मात्र अद्यापही शासनपातळीवरून होणारे दुर्लक्ष, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सुस्त कारभार आणि ठेकेदारीचे वाढलेले प्रस्थ यामुळे अजूनही ग्रामीण भागातील वीजग्राहकांना याचा फटका सातत्याने बसत आहे. महावितरणकडूनच होणारी नियमांची पायमल्ली, ठेकेदारांच्या मनमानीमुळे ग्राहक सेवेकडे झालेले दुर्लक्ष आणि विजेसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यातील दरिद्रीपणा, या महावितरणचा बट्ट्याबोळ करणाऱ्या कारभाराचा वेध घेणारी मालिका आजपासून...