एकच शिट्टी... पुन्हा राजू शेट्टी..!

By Admin | Published: May 17, 2014 12:37 AM2014-05-17T00:37:20+5:302014-05-17T00:38:40+5:30

कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसने सगळी ताकद पणाला लावूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी

Single Shot ... again Raju Shetty ..! | एकच शिट्टी... पुन्हा राजू शेट्टी..!

एकच शिट्टी... पुन्हा राजू शेट्टी..!

googlenewsNext

 कोल्हापूर : दोन्ही काँग्रेसने सगळी ताकद पणाला लावूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे तब्बल एक लाख ७७ हजार ३५६ इतक्या दणदणीत मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा दारुण पराभव झाला. ‘आप’चे उमेदवार व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांना अवघी ९०१५, तर मराठा संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांना २५ हजार ५४८ मते मिळाली. या दोघांचीही अनामत जप्त झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास निवडणूक अधिकारी अजित पवार यांनी अधिकृत निकालाची घोषणा केली व शेट्टी यांना विजयी प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दिवसभर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या नव्या इमारतीत मतमोजणी झाली. यावेळी शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करून गुलालाची उधळण केली. शेट्टी यांच्याविरोधात आवाडे यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्याने काय होणार याबद्दल लोकांत प्रचंड उत्सुकता होती. परंतु या मतदारसंघातील जनतेने जाणतेपणाने कौल दिला. गत निवडणुकीत शेट्टी वाळवा व शिराळा मतदारसंघांत मागे होते; परंतु या वेळेला सर्व सहाही मतदारसंघांत त्यांना भरभरून मते मिळाली. शाहूवाडीतील झाडून सगळे नेते शेट्टी यांच्या विरोधात असतानाही या तालुक्याने घसघशीत मताधिक्य दिले. गेल्या निवडणुकीत शेट्टी यांना शिरोळ या त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघात कसेबसे पाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळेला मात्र त्याच्या सहापट मताधिक्य या मतदारसंघाने दिले. इचलकरंजी हा आवाडे यांचा बालेकिल्ला. शेट्टी यांचा या शहरात फारसा संपर्क नाही. यंत्रमाग कामगारांच्या प्रश्नांत त्यांनी लक्ष घातले नाही, अशी टीका झाली. तरीही इचलकरंजीत शेट्टी यांना चांगली मते मिळाली ती मोदी फॅक्टरमुळे. शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर व भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनीही तळमळीने काम केल्याने शेट्टी यांच्या विजयास मोलाचा हातभार लागला. सुरुवातीच्या टप्प्यात शेट्टी यांच्या विरोधात लढायला कुणी तयार नव्हते. राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नाही म्हणून ही जागा काँग्रेसला देऊन शरद पवार यांनी ही जागा आवाडे यांना मिळवून दिली. त्यामुळे लढत जोरदार होणार असे चित्र तयार झाले. प्रत्यक्षात एकतर्फीच लढत झाली. गतनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांच्या प्रचारात काँग्रेसने हात आखडता घेतला. यावेळेला इचलकरंजीतील राष्ट्रवादी बघ्याच्या भूमिकेत राहिल्याने आवाडे यांचा पराभव झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Single Shot ... again Raju Shetty ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.