जिल्ह्यातील वाळू तस्कर होऊ लागले शिरजोर
By Admin | Published: December 11, 2015 10:55 PM2015-12-11T22:55:20+5:302015-12-12T00:15:04+5:30
प्रशासनात मतभिन्नता : चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश कोणाचा?; तलाठी, कोतवाल ‘लक्ष्य’
सांगली : घटना क्रमांक एक : जतचे तहसीलदार अभिजित पाटील पथकासह संख येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी थांबले असताना, वाळू वाहतूकदारांकडून पथकाचे वाहन ढकलण्याचा झालेला प्रयत्न... घटना क्रमांक दोन : वाळू वाहतूक रोखण्यासाठी करंजेत थांबलेल्या तलाठी, कोतवालावर वाळू तस्करांनी केलेला हल्ला... घटना क्रमांक तीन : उंबरगाव (ता. आटपाडी) येथे वाळू साठ्यावर कारवाईवेळी मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या पथकावर हल्ला. आठवड्यात जिल्ह्यात वाळू तस्करांकडून झालेल्या पथकावरील हल्ल्यांनी पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने जोरदार मोहीम राबविली आहे. या मोहिमेला प्रतिसादही मिळताना दिसत असताना, गेल्या आठवड्यापासून महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यांनी पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पथकात पोलीस नसल्याचा पुरेपूर अंदाज आलेल्या वाळू तस्करांनी आता थेट पथकालाच लक्ष्य केल्याने, जिल्ह्यात सुरू असलेली वाळू तस्करांविरोधातील मोहीम बारगळण्याची शक्यता आहे. वाळू तस्करांनी आता पथकाला न जुमानता हल्ल्यांचे सत्र राबविल्याने, महसूल विभागाच्या पथकाला पुरेसे संरक्षण व पथकात पोलीस प्रशासनातील व्यक्तींचा समावेश आवश्यक आहे. पथकावर हल्ला करुन दहशत निर्माण करु पाहणाऱ्या वाळू माफियांना नक्की बळ कोणाचे मिळत आहे, याच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केल्यास, वाळू माफियांची दहशत मोडीत काढण्यास मदत होणार आहे. अवैध वाळूची वाहतूक रात्रीच होत असल्याने पथकाला संरक्षण गरजेचे बनले आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार जिल्हास्तरावर अवैध गौणखनिजाची वाहतूक व उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस व आरटीओ यांची संयुक्त समिती गठित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य असणार आहेत, तर जिल्हा खणीकर्म अधिकारी या समितीचे सचिव असणार आहेत. जिल्ह्यात अजून या समितीची स्थापना झालेली नसल्याने महसूल विभागाच्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसण्यासाठी या पथकाची निर्मिती आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
महसूल, पोलीस, आरटीओ संयुक्त पथकाची प्रतीक्षा
शासनाच्या नवीन आदेशानुसार अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल पोलीस व आरटीओंच्या संयुक्त पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. पथकात पोलिसांचा समावेश असल्यास वाळू तस्करांवर जरब बसेल व आरटीओंच्या समावेशाने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोयीचे जाईल, हे या संयुक्त पथकाचे धोरण असल्याने जिल्ह्यात या संयुक्त समितीची स्थापन होण्याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूकदारांकडून हल्ल्याच्या घटना घडत असताना या विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते ‘नॉट रिचेबल’होते. पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याबाबत आधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.