जतला उन्हाच्या तडाख्याने जनावरांचे हाल
By admin | Published: May 31, 2017 12:18 AM2017-05-31T00:18:34+5:302017-05-31T00:18:34+5:30
जतला उन्हाच्या तडाख्याने जनावरांचे हाल
गजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात उन्हाच्या वाढत्या कडाक्याने दुभती जनावरे धापा टाकू लागली आहेत. उष्माक्षयाच्या झटक्याने दुभत्या म्हैशी, गाय जायबंदी होत आहेत, तर नवजात रेडके अशक्त जन्माला येऊ लागली आहेत. दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. जिवापाड जतन केलेल्या गाभण म्हैशींचे वाढत्या तापमानाने होणारे हाल पाहून पशुमालक धास्तावल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई आणि चारा टंचाईने दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. शेळ्या-मेंढ्यांवरही उन्हाचा परिणाम होत आहे.
तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५२ हजार ७८० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र ६५ हजार ७० हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र २३ हजार ३८० हेक्टर आहे. एकूण बागायत क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, तर जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर आहे.
खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी हा तालुका प्रसिध्द आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी माणदेशचे वैभव आहे. जातिवंत देखणी, चपळ, काटक, चिवट आणि रोगप्रतिकारक असणारी खिलार जनावरे प्रसिध्द आहेत. तालुक्यात गाई-बैल ८८ हजार ९०५, म्हैशी ६२, १३१, शेळ्या १ लाख ३० हजार ३९५, मेंढ्या ७७ हजार ९७६, कोंबड्या २ लाख ५१ हजार १९० अशी एकूण ६ लाख १० हजार ६०५ जनावरे आहेत.
पूर्वी कोरडवाहू जमीन, डोंगराळ भाग, पडीक जमिनीचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांचे पालन करणे सुलभ होते. सध्या तालुक्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. ५५ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई आणि चारा टंचाईने शेतकऱ्यांना दुभती जनावरे सांभाळणे मुश्किल झाले आहे. चारादेखील महाग झाला आहे.
साऱ्यात भर पडली आहे ती वाढत्या तापमानाची..! गेल्या महिन्यापासून तालुक्यात सातत्याने ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहिले आहे. वाढत्या तापमानाचा झटका दुभत्या म्हैशी, गाई या जनावरांना जीवघेणा ठरू लागला आहे. तापमान वाढीने अनेक दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. तापमान वाढीने अनेक दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. गावातील दूध संकलन केंद्रातील दूध घटले आहे. त्यामुळे गावात रतीब घालणाऱ्या गवळ्यांची संख्या कमी झाली आहे. दूध डेअरीतून ग्राहकांना ४0 ते ४५ रूपये लिटरने दुधाची विक्री केली जात आहे. पुणे, मुंबईतील दराच्या बरोबरीने दूध विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
गर्भपाताचे मोठे संकट
वाढत्या तापमानामुळे शेळ्या-मेंढ्या या लहान जनावरांवर गर्भपाताचे महासंकट उभे राहिले आहे. दिवस न भरताच शेळ्या, मेंढ्यांचा गर्भपात होत आहे. तसेच माजावर न येणे याही घटना घडू लागल्याने, वांझ प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे या घटना होत असताना, पशुसंवर्धन विभाग मात्र, जणू आपण त्या गावचे नसल्यासारखा डोळ्यावर झापड ओढून निवांत आहे. असे दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी पशुपालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, गाभण जनावरांचा वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत किमान गावपातळीवर तरी पशुपालकांच्या प्रबोधनाची मोहीम राबविणे गरजेचे आहे. याकडे पशुसंवर्धन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांत जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.