सांगली शहरात महापुराची स्थिती ‘जैसे थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:28+5:302021-07-26T04:24:28+5:30
सांगली : शहरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी महापुराच्या विळख्यात निम्म्याहून अधिक शहराला वेढा दिला आहे. रविवारी ...
सांगली : शहरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी महापुराच्या विळख्यात निम्म्याहून अधिक शहराला वेढा दिला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत हा वेढा सैल झालेला नव्हता. पाण्याची पातळी ५५ फुटांपर्यंत स्थिर झाली. रात्री उशिरा पाणी इंचाइंचाने कमी होत होते. दिवसभरात रतनशीनगर, सीतारामनगर, आमराई, छत्रपती शिवाजी क्रीडांगण, कत्तलखाना परिसरासह अनेक भागांत पुराचे पाणी शिरले होते.
सांगली शहराला महापुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील ६० टक्के भाग पाण्याखाली आहे. शनिवारी गावठाण परिसरासह उपनगरात पुराचे शिरले होते. दिवसभरात चार फुटाने पाण्याची पातळी वाढली. सकाळी आठच्या सुमारास आप्पासाहेब पाटीलनगर, रतनशीनगर परिसरात पाणी शिरले. आंबेडकर रस्त्यावरील सीतारामनगर परिसरातही पाणी आले. गणपती मंदिरातही पुराचे पाणी शिरले आहे.
आमराई रस्त्यावरून पुराचे पाणी काॅलेज काॅर्नरकडे सरकत होते. छत्रपती शिवाजी क्रीडांगणही पाण्याने तुडूंब भरले. क्रीडांगणाच्या मागील रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. स्टेशन चौकातून पाणी पेट्रोलपंपाच्या पुढे आले होते. मीरा हौसिंग सोसायटीतून टिंबर एरियाकडे पाण्याचा प्रवाह सुरू होता. खणभागातही अनेक गल्ल्यांमध्ये पाणी शिरले होते. फौजदार गल्लीतून पाणी हिराबाग वाॅटर वर्क्सच्या कंपाऊंड भिंतीपर्यंत आले होते. पत्रकारनगर पूर्णत: पाण्याखाली गेले आहे. तिथे चार ते पाच फूट पाणी आहे. रविवारी कत्तलखान्यात पुराचे पाणी शिरले. शामरावनगरमधील अनेक काॅलनीतही नव्याने पाणी आल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तथापि, महापुराचा विळखा काही सैल झालेला नव्हता. सकाळी पाण्याची पातळी इंचाइंचाने वाढत गेली, तर दुपारनंतर मात्र पातळी स्थिर झाली होती. रात्रीपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. पुराचे पाणी आलेल्या भागात पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. तरीही नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
चौकट
विश्वजित कदम यांच्याकडून पाहणी
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगलीतील स्टेशन चौक, हिराबाग कॉर्नर आदी पूरबाधित भागाला भेट देत पाहणी केली. स्टेशन चौकात स्थलांतरित कुटुंबांशी त्यांनी संवाद साधत विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, युवा नेते जितेश कदम, नगरसेवक प्रकाश मुळके, मयूर पाटील, चिंटू पवार आदी उपस्थित होते.