मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 04:23 PM2022-09-14T16:23:21+5:302022-09-14T16:23:48+5:30
कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण
मच्छिंद्र बाबर
माडग्याळ/सांगली : मोरबगी (ता. जत) येथे लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तराखंड येथील सहा साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काल, मंगळवारी घडली. या मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी लवंगा येथील सहा जणांना अटक तर, २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तराखंड येथील सहा साधू मोटारीतून (क्र. यूके ०६ एएच ६१५२) प्रवास करीत विजापूरहून पंढरपूरकडे निघाले होते. मंगळवारी दुपारी मोरबगी येथे लवंगा व उमदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमदीकडे जाणारा चालकास रस्ता लक्षात आला नाही. यामुळे त्यांनी तेथे असलेल्या एका मुलाला जवळ बोलावून रस्ता विचारला. मात्र साधूंचा पोशाख पाहून घाबरलेल्या मुलाने रस्ता सांगण्याऐवजी आरडाओरडा सुरु केली.
मुलाच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण सुरू केली. साधूंनी विनवणी करूनही लोक शांत होत नव्हते. उमदी पोलिसांना फोनवरून माहिती देऊन 'तुम्ही लहान मुले पळवायला आलाय' असे म्हणत वाहनचालकासह सर्व साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले.
उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन मारहाण होत असलेल्या साधूंना वाचवले व उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मारहाण प्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार देत निघून गेले. ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी कोल्हापूरचे विशेष पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.
संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या - पोलीस अधीक्षक
लवंगा येथील सहा जणांना उमदी पोलिसांनी अटक करून सुमारे पंचविसजणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी परराज्यातील संशयीत व्यक्तीबाबत संशय आल्यास कायदा हातात कोणी न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
उमदी पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला
घटनास्थळी उमदीचे पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब खरात वेळीच फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून साधूंना बाजुला घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची खातरजमा केल्याने अनर्थ टळला, अशी चर्चा होती.