MPSC EXAM: लेखनिकची रिसिट मिळाली, पण यादीत नावच नाही; दृष्टीहीन विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 04:29 PM2022-02-26T16:29:54+5:302022-02-26T16:42:13+5:30
दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय यंत्रणाच असावी, असा सूर परीक्षा देणाऱ्या काही सामान्य विद्यार्थ्यांमधून उमटला.
सांगली : जिल्ह्यातील दृष्टीहीन असलेल्या सहा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागले. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यांना लेखनिकचा उल्लेख असलेली रिसिट मिळाली, त्यामुळे ते थेट परीक्षेला गेले. मात्र, प्रपत्र न भरल्याने त्यांचे परिक्षार्थींच्या यादीत नावच आले नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवारी जिल्ह्यात विविध केंद्रांवर पार पडली. यात दिव्यांगांसह काही दृष्टीहीन विद्यार्थ्यांनीही अर्ज भरले होते. त्यांना ऑनलाईन रिसिटही मिळाली. त्यामुळे ते थेट परीक्षेला गेले, मात्र लेखनिक (रायटर) असलेल्या यादीत त्यांचे नावच नसल्याने या सहाजणांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला नाही.
ते हताश होऊन तासभर तिथेच थांबले. परीक्षा संपल्यानंतर सांगलीच्या एका केंद्र निरीक्षकाने त्या दृष्टीहीन विद्यार्थीना बोलावून प्रपत्र भरल्याबाबत विचारणा केली. असे आणखी एक स्वतंत्र प्रपत्र भरायचे असते, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. काही दिव्यांग परिक्षार्थींनी असे प्रपत्र भरल्यामुळे त्यांचे यादीत नाव आले होते, मात्र या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नव्हती.
वास्तविक याबाबतची कल्पना आयोगानेच मेलद्वारे द्यायला हवी. दुसऱ्याच्या मदतीशिवाय काही करता येत नसलेल्या या दृष्टीहीन विद्यार्थ्यांना कुठेही याबाबतचे मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे परीक्षेची तयारी करुनही एका फॉर्मची कल्पना नसल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले.
प्रपत्र भरले नसल्याने हा गोंधळ झाल्याचे संबंधित परीक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटी खापर दृष्टीहीन विद्यार्थ्यांवरच फुटले. ज्यांना दृष्टी आहे अशा लोकांना अनेक ठिकाणी जाऊन चौकशी करुन नियमानुसार अर्ज दाखल करता येऊ शकतात, मात्र दृष्टीहीन विद्यार्थ्यांना असे करणे कठीण असते. त्यामुळे त्यांना मदत करणारी शासकीय यंत्रणाच असावी, असा सूर परीक्षा देणाऱ्या काही सामान्य विद्यार्थ्यांमधून उमटला.