विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे सहा किलोचे ओझे दीड किलोवर!
By admin | Published: February 11, 2016 11:24 PM2016-02-11T23:24:25+5:302016-02-11T23:33:21+5:30
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम : सहा हजार विद्यार्थ्यांची झाली ओझ्यातून सुटका, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक -- गुड न्यूज
सांगली : राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पावले टाकली आहेत. त्याला प्रतिसाद देत लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची या ओझ्यातून सुटका केली. लठ्ठे सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील व संस्थेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी नियोजनबद्धरित्या सहा किलो दप्तराचे ओझे दीड किलोवर आणले आहे. संस्थेच्या सहा हजार विद्यार्थ्यांची या ओझ्यातून सुटका केली आहे.
सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकात लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आहेत. अध्यक्ष सुरेश पाटील यांनी संस्थेच्या विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. त्यात शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याच्यादृष्टीने पावले टाकली आहेत. या उपक्रमाला प्रतिसाद देत संस्थेमधील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ओझे कसे कमी करता येईल, यावर विविध स्तरावर चर्चा झाली. बालमानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला.
शाळेत एकादिवशी विविध विषयांचे तास घेतले जात होते. किमान सहा ते सात विषयांची पुस्तके, वह्या, स्वाध्यायपुस्तके आदींचे दप्तर विद्यार्थ्यांना दररोज घेऊन यावे लागते. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेचे वेळापत्रकच बदलण्यात आले. एकादिवशी एका विषयाचे दोन तास ठेवण्यात आले. त्यामुळे दररोज केवळ तीन ते चार विषयांच्याच तासाचे नियोजन झाले. तीन भाषा विषयांसाठी एक वही, विज्ञान व गणितासाठी एक वही व समाजशास्त्रासाठी एक वही, अशा तीनच वह्या विद्यार्थ्यांकडे असतील, याची दक्षता घेतली. शाळेतील स्वाध्यायची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र दिवस निश्चित करण्यात आला. परिणामी दररोज स्वाध्यायच्या वह्या आणण्याची आवश्यकताच उरली नाही. खासगी शिकवणीच्या वह्यांना दप्तरात बंदी घातली. दप्तर आणण्यासाठी सॅकऐवजी कमी वजनाच्या टिकाऊ बॅगा तयार करून त्या विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
एका बेंचवरील दोन विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या पुस्तकांची विभागणी केली. त्यामुळे एका विद्यार्थ्यास एकच पुस्तक आणावे लागते. शाळेतच शुद्ध पाण्याची सोय करून पाण्याच्या छोट्या रिकाम्या बाटल्या आणण्याची सक्तीही केली. परिणामी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे सहा किलोवरून दीड किलोपर्यंत कमी झाले आहे. संस्थेच्या सांगली हायस्कूल, राजमती हायस्कूल, पॅ्रक्टिसिंग स्कूल, दत्तवाड, जयसिंगपूर शाळेतही उपक्रम सुरू आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करून त्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे व पूर्णक्षमतेने विद्यार्थ्यांनी अध्ययन प्रक्रियेत सहभागी व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वाचा होता. पालकांशी चर्चा करून त्यांची लेखी संमती घेऊन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
- सुरेश पाटील, अध्यक्ष लठ्ठे एज्युकेशन सोसायटी
संस्थेने विद्यार्थ्यांसाठी असा राबविला उपक्रम
विद्यार्थ्यांच्या शालेय वेळापत्रकात बदल
एकाचदिवशी एका विषयाचे दोनच तास
तीन भाषांसाठी एक वही, गणित विज्ञानसाठी एक वही व समाजशास्त्रासाठी एक वही
स्वाध्याय पुस्तिकांच्या तपासणीसाठी स्वतंत्र दिवसाची निश्चिती
सॅकऐवजी कमी वजनाच्या बॅगेचा वापर
दोन विद्यार्थ्यांमध्ये भाषेच्या पुस्तकांची विभागणी