सांगलीजवळ सहा लाखांचा तांदूळ साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:41+5:302020-12-05T05:04:41+5:30
सांगली : मिरज तालुक्यातील लक्ष्मी फाटा येथून शिराळा येथे रेशनिंगचा तांदूळ घेऊन चाललेला ट्रक सांगली ग्रामीण पोलिसांनी लक्ष्मी फाट्यानजीक ...
सांगली : मिरज तालुक्यातील लक्ष्मी फाटा येथून शिराळा येथे रेशनिंगचा तांदूळ घेऊन चाललेला ट्रक सांगली ग्रामीण पोलिसांनी लक्ष्मी फाट्यानजीक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल सहा लाख २ हजार १०० रुपये किमतीचा २० टन ७० किलो तांदूळ आढळून आला. याप्रकरणी रमेश बाबू गुंडेवाडी (रा. सलगरे), प्रकाश केरबा पाडुळे व विजय दत्तात्रय शिंदे (दोघेही रा. हरिपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास लक्ष्मी फाटा येथून ट्रक (एम एन ०९ बीसी १७५८) मधून तांदूळ भरून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत ट्रकची तपासणी केली असता, त्यात रेशनिंगचा तांदूळ मिळून आला. जो शिराळा येथे नेण्यात येत होता.
सलगरे येथील रमेश गुंडेवाडी याने बेकायदेशीरपणे तांदळाचा साठा करून तो काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न होता. यासाठी पाडुळे याच्या मालकीच्या ट्रकमधून तांदूळ शिराळ्याकडे नेण्यात येत होता. या ट्रकवर शिंदे चालक म्हणून होता. काळ्या बाजारात तांदूळ नेला जात असल्याचे माहित असूनही पाडुळे याने आपले वाहन उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप मोरे, सचिन मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
------------------------
फोटो : ०२ शरद ०२